Waste Processing Project Pudhari
पुणे

Pune Waste Processing Project Tipping Fee: पुणे कचरा प्रकल्पाच्या ९४३ रुपये टिपिंग शुल्काला ब्रेक; महापालिकेने भूमी ग्रीनला दिली दर कमी करण्याची सूचना

५०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा वाढीव खर्च टाळण्याचा प्रयत्न; तीन दिवसांत सुधारित दर सादर करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील ५०० टन ओला आणि सुका कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी भूमी ग्रीन एनर्जी एनव्हायरोकेअर एलएलपी कंपनीने सादर केलेला ९४३ रुपये प्रतिटन टिपिंग शुल्काचा दर महापालिकेने दुसऱ्यांदा फेटाळला आहे.

वाढीव दरामुळे महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने कंपनीला पुन्हा एकदा सुधारित आणि वाजवी दर सादर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून, मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

शहरातील दररोजच्या ३०० टन ओल्या आणि २०० टन सुक्या, अशा एकूण ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने २० वर्षांच्या कालावधीसाठी (१५ वर्षे अधिक ५ वर्षे) निविदा प्रक्रिया राबविली होती.

या निविदेत केवळ भूमी ग्रीन एनर्जी एनव्हायरोकेअर एलएलपी आणि अँटोनी लारा एनव्हायरो सोल्यूशन प्रा. लि. या दोनच कंपन्यांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाली होती. निविदा उघडल्यानंतर अँटोनी कंपनीने १,१९० रुपये, तर भूमी ग्रीनने ९४३ रुपये प्रतिटन दर सादर केला.

घनकचरा विभागाने कंपनीला पाठविलेल्या पत्रात प्रकल्प स्वयंचलित असल्याने मनुष्यबळाचा खर्च कमी होणार, प्रारंभिक उभारणीचा खर्च विभागला जाणार आणि महागाई निर्देशांकानुसार स्वतंत्र दरवाढ मिळणार असल्याने टिपिंग शुल्क कमी करण्यास वाव असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अंतिम सवलतीचा सुधारित दर आणि त्याचे विश्लेषण तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
संतोष वारुळे, उपायुक्त घनकचरा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT