Waste Processing Project Pudhari
पुणे

Pune Waste Processing Project: पुणे महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात १२८ कोटींची बचत; निविदा दरात मोठी कपात

५०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा दर ९४३ वरून ७७२ रुपये प्रतिटन; २० वर्षांच्या करारात पालिकेला आर्थिक दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या ५०० मेट्रिक टनक्षमतेच्या ओला आणि सुका कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदेत मोठी आर्थिक बचत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मे. भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हाॅयरोकेअर एलएलपी या कंपनीने सुरुवातीला प्रतिटन ९४३ रुपये दराची निविदा सादर केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने दरकपातीसाठी केलेल्या चर्चेनंतर हा दर प्रतिटन ७७२ रुपयांपर्यंत खाली आणण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे या २० वर्षांच्या करारात महापालिकेवर येणारा सुमारे १२८ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा टळणार असून, पुणेकरांच्या कररूपी पैशांची मोठी बचत होणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील दररोज निर्माण होणाऱ्या ३०० टन ओला आणि २०० टन सुका अशा एकूण ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबविली आहे. या प्रकल्पाचा करार कालावधी १५ वर्षे आणि त्यानंतर पाच वर्षांची मुदतवाढ असा एकूण २० वर्षांचा आहे. यापूर्वी मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया न राबविता हे काम संबंधित ठेकेदाराला देण्याचा प्रयत्न झाला होता.

त्या वेळी कंपनीने ६९४ रुपये प्रतिटन आणि दरवर्षी १० टक्के दरवाढ, या अटीवर काम करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, नियमित निविदा प्रक्रियेनंतर त्याच कंपनीने प्रतिटन ९४३ रुपये दराचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला कंपनीने ७७७ रुपये प्रतिटन आणि प्रतिवर्षी सात टक्के दरवाढ, असा सुधारित प्रस्ताव दिला. त्यानंतर झालेल्या तडजोडीनंतर अखेर ७७२ रुपये प्रतिटन आणि प्रतिवर्षी सात टक्के दरवाढ या अटींवर करार अंतिम केला.

या सुधारित दरामुळे पहिल्या वर्षीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून, संपूर्ण २० वर्षांच्या कालावधीत महापालिकेचा एकूण खर्च ५७७ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित राहणार आहे. याउलट प्रतिटन ९४३ रुपयांचा दर कायम राहिला असता महापालिकेला ७०५.५० कोटी रुपये खर्च करावे लागले असते. त्यामुळे दोन्ही दरांतील तफावतीमुळे सुमारे १२८ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

याशिवाय, जर पूर्वी चर्चेत असलेल्या १० टक्के वार्षिक दरवाढीचा नियम ९४३ रुपयांच्या दरालाही लागू झाला असता, तर या प्रकल्पाचा खर्च तब्बल ९८६ कोटी रुपयांपर्यंत पोहचला असता. मात्र, प्रशासनाने दर कमी करून वार्षिक वाढ सात टक्क्यांवर आणल्याने महापालिकेची मोठी आर्थिक बचत झाली आहे.

१० टक्के दरवाढ लागू झाली असती तर...

  • प्रतिटन दर- ९४३

  • वार्षिक दरवाढ - १० टक्के

  • करार कालावधी- २० वर्षे

  • संभाव्य एकूण खर्च- ९८६ कोटी

५०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी ठेकेदाराने प्रतिटन ९४३ रुपयांचा दर दिला होता. प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करून हा दर ७७२ रुपयांपर्यंत कमी केला. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवरील मोठा आर्थिक भार टळला असून, सार्वजनिक निधीची कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे.
नवल किशोर राम, आयुक्त, मनपा, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT