Pune Waste Picker Students SSC Result Pudhari
पुणे

Pune Waste Picker Students SSC Result: पुण्यात कचरावेचकांच्या मुलांचे दहावीमध्ये घवघवीत यश; डॉक्टर-इंजिनिअर होण्याची स्वप्ने

आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत मिळवले उल्लेखनीय गुण; यशाने डोळ्यांत आनंदाश्रू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कचरावेचक असलेल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याचे काम त्यांच्या मुला-मुलींनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवून केले असून, कचरावेचकांच्या मुला-मुलींनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आता यातील काहींना डॉक्टर व्हायचेय तर कोणाला इंजिनिअर... त्यांच्या स्वप्नांना दहावीच्या यशाने पंख मिळाले आहेत.

कमीत कमी संसाधनातही कष्ट आणि जिद्दीमुळे त्यांनी हे यशाचे शिखर गाठले असून, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतमधील सदस्यांच्या मुलांचे हे यश वाखाणण्याजोगे आहे. सुमारे 199 विद्यार्थ्यांपैकी 109 मुलांनी आणि 90 मुलींनी यंदा दहावीची परीक्षा दिली. त्यातील बऱ्याच जणांनी परीक्षेत यश प्राप्त केले आहे.

खुशी खुपटे हिने दहावीच्या परीक्षेत 89 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिची आई कावेरी खुपटे या कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या सभासद आहेत. एकल माता असलेल्या कावेरी दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली आहे. आईच्या कष्टाचे खुशीने दहावीत यश मिळवून चीज केले आहे.

सार्थक चंदनशिवेने दहावीच्या परीक्षेत 86.60 टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्याची आई साधना मेश्राम चंदनशिवे या मागील दोन वर्षांपासून स्वच्छ संस्थेच्या सभासद आहेत. त्यांचे पती रोजगार पद्धतीने कष्टाची कामे करतात. आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करत सार्थकने दहावीत यश मिळवले आहे.

सानिका अडसूळ याने 78 टक्के गुण प्राप्त करून यश मिळवले आहे. सानिकाची आई राणी अडसूळ या गेल्या 10 वर्षांपासून संघटनेच्या सभासद आहेत. राणी अडसूळ या एकल माता असून, त्यांच्या पतीचे 2016 साली निधन झाले. त्यानंतर मुलांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी हार न मानता सानिकाचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सानिकाने अथक प्रयत्न करून दहावीची परीक्षा दिली, त्यात यश संपादन केले आहे.

दिव्या शिरसाठने 75 टक्के गुण प्राप्त केले आहेत. दिव्याने दहावीच्या परीक्षेची तयारी अत्यंत मेहनतीने आणि सातत्याने केली. तिची आजी आणि वडील दोघेही कचरावेचक म्हणून काम करतात. ती म्हणते, मोबाईलचा मर्यादित वापर करा, अभ्यासात सातत्य ठेवा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. मेहनत आणि चिकाटीमुळे यश निश्चित मिळते.

वडिलांच्या कष्टाचे चीज

तनू तरकसे हिने 81.08 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिचे वडील भारत तरकसे हे गेल्या आठ वर्षांपासून संघटनेचे सभासद आहेत, ते पिंपरी-चिंचवड भागात घंटा गाडीवर काम करतात. वडिलांच्या कष्टाची मला जाणीव आहे आणि त्यामुळे मेहनत करून यश मिळवले. वडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे, अशा भावना तनुने व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT