पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूरकडे जाणार्या वारकर्यांच्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष व्यवस्था केली आहे. ही तपासणी दिवे घाट आणि आळंदी रोडवरील आरटीओ कार्यालयात होणार असून, यासाठी दोन वरिष्ठ अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पालखी सोहळा 19 जूनपासून सुरू होत आहे. या कालावधीत मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला रवाना होतात. त्यांच्या वाहनांची सुरक्षितता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आरटीओने हे पाऊल उचलले आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या आदेशानुसार ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. पंढरपूर येथे पोहोचणार्या वारकर्यांनी तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. या व्यवस्थेमुळे पालखी सोहळा अधिक सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
दिवे घाट
- दिनांक: 9 ते 19 जून 2025
- वेळ:- सकाळी 11:30 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत
- तपासणी अधिकारी : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले
आळंदी रोड आरटीओ कार्यालय
- दिनांक: 9 ते 19 जून 2025
- वेळ :- सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- तपासणी अधिकारी :- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर देसाई