

अंकली : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असणार्या दोन अश्वांचे अंकली (ता. चिकोडी) येथून 8 रोजी आळंदीकडे प्रस्थान झाले. हे अश्व 18 जून रोजी आळंदी येथे पोहोचणार असून त्यानंतर माऊलीच्या पालखीचे आळंदी येथून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे.
वारकरी संप्रदायात 1832 पासूनची ही समृद्ध परंपरा असल्याचे श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितले. सोहळा मार्गस्थ झाल्यावर संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालत असतो, तो माऊलींचा अश्व व जो ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असे हे 2 अश्व पालखीच्या सोहळ्यात असतात. या अश्वांची मानाची परंपरा अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे आहे. सध्या ही परंपरा उर्जितसिंहराजे शितोळे हे चालवत आहेत. हे दोन्ही अश्व अंकली येथून पायीच आळंदी येथे दाखल होतात. 8 रोजी अंकली येथून अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले.
8 जूनचा मुक्काम मिरज, 9 रोजी सांगलवाडी, 10 जून रोजी इस्लामपूर पेठनाका, 11 रोजी वहागाव, 12 रोजी भरतगाव, 13 रोजी भुईंज, 14 रोजी सारोळा, 15 रोजी शिंदेवाडी, 16 व 17 रोजी पुणे व 18 रोजी आळंदी असा या अश्वांचा प्रवास आहे, श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितले.
1832 मध्ये हैबतबाबांनी माऊलींचा सोहळा सुरू केला. तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. सोहळ्यात रोज पहाटे 4 वाजता अश्वाला निमंत्रण द्यायला चोपदार जातात व त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तिथून तो पुढे मार्गस्थ होतो. सोहळ्यात व इतरवेळी कधीही माऊली अश्वावर कोणीही बसत नाही.
श्रीमंत सरदार उर्जितसिंहराजे शितोळे सरकार (अंकलीकर)
रोज साधारण 30 किमी प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो. सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला जातो. मुक्कामाची ठिकाणे परंपरेनुसार ठरलेली असतात. वारी काळात दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी माऊलींना आरतीनंतर पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. हा मान परंपरेनुसार शितोळे सरकारांकडे आहे. विठ्ठलाची भेट घेेण्यासाठी जाणार्या वारकरी मेळ्यात कर्नाटकाला मानाचे स्थान आहे.
महादजीराजे शितोळे सरकार (अंकलीकर)