Pune Wari Darashan Pudhari
पुणे

Pune Wari VIP Darshan Controversy: वारीत ‘व्हीआयपी दर्शन’वरून वाद; तासन्‌तास रांगेत उभ्या वारकऱ्यांमध्ये नाराजी

ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी गर्दी; निवडक मान्यवरांना स्वतंत्र मार्गाने दर्शन दिल्याचा आरोप, महापालिकेचे स्पष्टीकरण प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आषाढी वारीनिमित्त भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविकांनी गर्दी केली होती.

विठ्ठल नामाच्या अखंड गजरात सर्वसामान्य भाविक कित्येक तास रांगेत उभे राहून दर्शनाची प्रतीक्षा करीत असतानाच पुणे महापालिकेकडून काही निवडक मान्यवरांना विशेष 'व्हीआयपी पास'च्या माध्यमातून स्वतंत्र मार्गाने दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्रकारामुळे वारकरी आणि भाविकांकडून नाराजी व्यक्त होत असून, महापालिकेच्या या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शुक्रवारी (दि. १०) पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम असल्याने दिवसभर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेक भाविकांना उकाडा, प्रचंड गर्दी आणि धक्काबुक्कीचा सामना करीत रांगेत तासन‌्तास थांबावे लागले. मात्र, काही निवडक व्यक्तींना विशेष पासच्या माध्यमातून स्वतंत्र मार्गाने जलद दर्शनाची सुविधा देण्यात आल्याचा आरोप वारकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

या व्यवस्थेमुळे 'माऊलीच्या दरबारात सर्व भक्त समान' या वारकरी संप्रदायाच्या मूलभूत तत्त्वालाच धक्का बसत असल्याची भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली. साधेपणा, समता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेत अशा प्रकारची 'व्हीआयपी' व्यवस्था योग्य आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, हे विशेष 'व्हीआयपी पास' नेमके कोणासाठी तयार केले, ते कोणाला दिले, त्यासाठी कोणते निकष निश्चित केले आणि अशा व्यवस्थेची आवश्यकता नेमकी का भासली, याबाबत महापालिकेकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. महापालिकेच्या या कथित विशेष पास व्यवस्थेमुळे वारकरी आणि भाविकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, समानतेचा संदेश देणाऱ्या वारीत अशा प्रकारच्या व्यवस्थेची गरज होती का? असा प्रश्न विविध स्तरांतून उपस्थित केला जात आहे. मात्र, या आरोपांबाबत महापालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT