पुणे: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 'पुणे प्रथम-सेवावारी'चा मोठा गाजावाजा करणाऱ्या महापालिकेच्या दाव्यांना प्रत्यक्षात वारकऱ्यांच्या गैरसोयींना सामोरे जावे लागण्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. अपुरी स्वच्छतागृहे, मुक्कामस्थळी गैरव्यवस्था, वारकऱ्यांचे साहित्य बाहेर फेकल्याचा आरोप आणि मोफत स्वच्छतागृहासाठी पैसे आकारल्याच्या तक्रारींमुळे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेने वारकऱ्यांसाठी निवारा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला होता. मात्र, या सुविधा घेताना वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते ऋषीकेश बालगुडे यांनी केला. घोरपडे पेठेतील महर्षी अण्णासाहेब शिंदे विद्यालयात मुक्कामासाठी आलेल्या वारकऱ्यांचे साहित्य वर्गखोलीतून बाहेर काढून त्यांना व्हरांड्यात झोपण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप ऋषीकेश बालगुडे यांनी केला आहे. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट दिली असता संबंधित वर्गाला कुलूप लावलेले होते, तर वारकरी बाहेरच विश्रांती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील साहित्य असल्यामुळे खोली बंद केल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले; मात्र वारकऱ्यांचे साहित्य बाहेर का ठेवले आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था का केली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा बालगुडे यांनी केला.
वारकऱ्यांच्या मुक्कामातच पाण्याचा ठणठणाट
आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी असताना त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. वारकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू देणार नाही, असा दावा करत दिवसाआड पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे पालख्या मुक्कामी असलेल्या नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ यांसह मध्यवर्ती भागातील अनेक ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने वारकऱ्यांची गैरसोय झाली.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या गुरुवारी रात्री पुण्यात मुक्कामी आल्या. या पालख्यांसमवेत लाखो वारकरी शहरातील विविध भागांमध्ये मुक्कामी आहेत. त्यांना अंघोळ, कपडे धुणे आणि दैनंदिन वापरासाठी पाण्याची गरज असताना शुक्रवारी सकाळच्या वेळेत अनेक शाळा, मंगल कार्यालये आणि महापालिकेने उभारलेल्या पाणवठ्यांवर पाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पाणी आले असले तरी कमी दाबामुळे केवळ बारीक धार येत होती. त्यामुळे वारकऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांकडे पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांनी सुरुवातीला फोन न उचलल्याने संताप व्यक्त करण्यात आला. वारकऱ्यांसाठी दिवसाआड पाणीकपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ऐन पालख्यांच्या मुक्कामाच्या दिवशीच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
सार्वजनिक स्वच्छतागृहात वारकऱ्यांकडून प्रत्येकी २० रुपये
सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वारकऱ्यांना मोफत वापर करता येणार, अशी घोषणा महापालिकेने केली होती. मात्र, गंज पेठेतील सोनवणे रुग्णालया समोरील सार्वजनिक स्वच्छतागृहात वारकऱ्यांकडून प्रत्येकी २० रुपये आकारण्यात येत होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. काही ठिकाणी स्वच्छतागृहांनाही कुलूप असल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व प्रकाराबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. सोमवारी या संपूर्ण प्रकरणाचा जाब महापालिका प्रशासनाकडे विचारणार असल्याचे ऋषीकेश बालगुडे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेचे मौन
महापालिकेने 'पुणे प्रथम-सेवावारी'चा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला; मात्र प्रत्यक्षात वारकऱ्यांना पाणी, स्वच्छता आणि मुक्कामाच्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागल्याचे चित्र समोर आले आहे. लाखो वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी केल्याचे सांगणाऱ्या प्रशासनाच्या दाव्यांची प्रत्यक्ष व्यवस्थेनेच पोलखोल केली असून, ही 'सेवावारी' नव्हे, तर 'हालवारी' ठरल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. या आरोपांबाबत पुणे महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही.