वडगाव शेरी: कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगरमध्ये मोकळ्या जागामध्ये सायंकाळी सातनंतर चारचाकी गाड्यांमध्ये आणि दुचाकींवर बसून अनेक जण मद्यपान करीत आहे. ठिकठिकाणी असे चित्र सध्या दिसून येत असून, परिसरात सायंकाळनंतर ‘ओपन बार’ सुरू होत आहे. मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सोपाननगर, गुलमोहर सेंटर, विमानगर वेकफिल्ड आयटी पार्क, विमानतळ रस्त्यावरील मोकळ्या जागा, कल्याणीनगर बिशप शाळेच्या मागे, कल्याणीनगर लॅन्ड मार्क गार्डन सोसायटी जवळचा बसथांबा, विमाननगर आयबीस हॉटेलच्या मागे, खराडी येथील वर्ल्ड ट्रेंड सेंटरजवळील मोकळी जागा, झेन्सॉर आयटी पार्क मैदान, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल ते वर्ल्ड ट्रेड सेंटर रस्ता, आपले घर सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील मोकळी जागा, विमाननगर ई स्पेस आणि मंत्री कॉम्प्लेक्स जवळील सायकल ट्रॅक, तसेच वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागातील पदपथ आणि मोकळ्या जागांमध्ये सातनंतर चारचाकी गाड्यांमध्ये आणि दुचाकींवर बसून मद्यपी मद्यपान करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आयटी पार्कमधून सुटलेले कर्मचारी, विद्यार्थी, पीजीमध्ये राहणारे युवक आणि परप्रांतीय नागरिक दारू पित घोळका करून पहाटेपर्यंत या भागात बसतात. मद्यपींना स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर वादावादी होतात. अनेकदा मद्यपी स्थानिक नागरिकांना मारहाण करतात. रस्त्यांवर दारूच्या बॉटल फोडतात आणि जोरजोरात ओरडतात. तसेच ते परस्परांमध्ये मारहाण करतात.
सोपाननगरला वाईन शॉपसमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेडछाडही करतात. मद्यपी रोडरोमिओंमुळे सायंकाळी महिला, मुली मोकळ्या जागेच्या जवळील रस्त्यांवरून जात नाही. रात्री महिलासाठी रस्ता बंद हा अलिखित नियम झाला आहे. मद्यपींच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मद्यपींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, तसेच या भागांमध्ये गस्त सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस आयुक्तांपासून स्थानिक पोलिस ठाण्याकडे निवदेनाद्वारे करीत आहेत. मात्र, पोलिसांकडून केवळ तात्पुरती कारवाई केली जात असल्याने त्यांनतर परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी होत आहे.
पोलिसांनी तत्परतेने कारवाई करावी
या भागातील महिला रात्री-अपरात्री कामावरून घरी येतात. त्यांना मद्यपींचा त्रास होतो. प्रशासनाने मोकळ्या जागेत दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाई केली आणि गस्त वाढवली पाहिजे. पोलिसांना कॉल केल्यास, तत्परतेने कारवाई करण्याची गरज असल्याचे मत परिसरातील महिलांकडून व्यक्त होत आहे.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नियमितपणे मद्यपींवर कारवाई केली जात आहे. मात्र, मोकळ्या जागेत कोणी दारू पित असेल, तर नागरिकांनी पोलिस ठाण्यात संपर्क साधून याबाबत तक्रार करावी.गोविंद जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे