Voter List Pudhari
पुणे

Pune Voter List Revision: पुणे जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ९६ टक्के अर्जांचे वितरण पूर्ण

६५.५३ टक्के अर्जांचे डिजिटलायझेशन; अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची यादी प्रसिद्ध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ९६ टक्के अर्जांचे वितरण पूर्ण झाले असून, ६५.५३ टक्के अर्जांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस तहसीलदार शीतल मुळे यांच्यासह नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव व प्रतिनिधी उपस्थित होते.

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. राजकीय पक्षांनी या याद्यांचे अवलोकन करून आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच नमुना क्रमांक ६, ७ व ८ मधील अर्जांची तपासणी करून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी त्याचा उपयोग करावा, असे आवाहन कळसकर यांनी केले.

मतदारयादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्राप्त होणारे दावे व हरकती विहित मुदतीत निकाली काढण्यासाठी प्राधान्याने नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदार नोंदणीसाठी सहकार्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर व शिक्षक मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या प्रक्रियेत शिक्षक आणि पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कळसकर यांनी केले.बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदारयादी पुनरीक्षण प्रक्रियेतील अडचणी आणि सूचना मांडल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी संबंधित अडचणींचे निरसन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT