Assault Pudhari
पुणे

Pune Crime: विश्रांतवाडीत १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; ५२ वर्षीय आरोपीला अटक

वैद्यकीय तपासणीदरम्यान प्रकार उघड; पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील विश्रांतवाडी परिसरात राहणार्‍या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५२ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना १२ सप्टेंबरला घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, वैद्यकीय तपासणीवेळी डॉक्टरांच्या माहितीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. जयसिंग भानुदास साठे (वय ५२, रा. कामगारनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या कंत्राटी पद्धतीने महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विश्रांतवाडी परिसरातील एका रुग्णालयात २२ सप्टेंबरला महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह वैद्यकीय तपासणीसाठी गेली होती. त्या वेळी डॉक्टरांनी मुलीला तपासले असता, तिच्यावर १२ सप्टेंबरला लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतला. आरोपी साठेविरुद्ध बीएनएस कलम ७४, ३५१(२) तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, दोघीचाही पुरवणी जबाब विश्रांतवाडी पोलिसांनी नोंदवला आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्ह्यात बीएनएस कलम ६५(२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६ आणि १२ वाढवले आहेत. याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येत आहे. आरोपी हा पीडितेचा नातेवाईक नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याने मुलीला जाळ्यात कसे अडकवले, याचा तपास केला जात आहे.

नातलगांचे पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन

अल्पवयीन मुलीवर सफाई कर्मचार्‍याने १२ सप्टेंबरला लैंगिक अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ पीडितेच्या नातलगांसह इतर नागरिकांकडून विश्रांतवाडी परिसरासह पोलिस ठाण्यालगत रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडो नागरिक रस्त्यावर आले होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT