E Cigarette Pudhari
पुणे

Pune E Cigarette Ganja Seizure: कॉस्मेटिक ज्वेलरी दुकानाच्या आडून ई-सिगारेट, गांजाची विक्री; तरुणीला अटक

पुण्यातील विमाननगरमध्ये पोलिसांचा छापा; २ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानाच्या आडून ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आणि गांजाची विक्री करणाऱ्या तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. विमाननगरमधील ‘क्लाऊड कार्टेल’ या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर, १३० ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अभिलाषा पंकज अहिरराव (वय २२, रा. विमाननगर) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती पोलिस अंमलदार हरीप्रसाद पुंडे आणि लालू करहे यांना मिळाली होती. त्यानुसार, ३ नोव्हेंबर रोजी विमाननगर येथील ‘क्लाऊड कार्टेल’, दुकान क्रमांक ९ येथे छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान दुकानात तसेच दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आणि १३० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.

पोलिस तपासात संबंधित तरुणी मोबाइलवरून ऑर्डर घेऊन प्रतिबंधित वस्तूंची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. विमाननगर परिसरातील आयटी कंपन्या, मोठी महाविद्यालये आणि तरुण वर्गाला लक्ष्य करून हा व्यवसाय सुरू केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी तिने विमाननगरमधील डेक्कन परिसरातील दुकान बंद करून ‘क्लाऊड कार्टेल’ या नावाने कॉस्मेटिक ज्वेलरीचे दुकान सुरू केले होते. या दुकानाच्या आडून ती अवैध व्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ आणि सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन अधिनियम, २००३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT