Vehicles Without Number Plates Pudhari
पुणे

Pune Vehicles Without Number Plates: पुण्यात विनानंबर प्लेट वाहनांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विशेष कारवाईची तयारी

अपघातानंतर वाहनचालकांचा शोध घेण्यात अडचणी; विनानंबर प्लेट वाहनांचे फोटो पीटीपी ॲपवर अपलोड करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात सध्या विनानंबर प्लेट असलेल्या वाहनांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे. अनेक दुचाकीस्वारांच्या गाड्यांच्या मागची किंवा पुढची नंबर प्लेट गायब असल्याचे, तर काही ठिकाणी नंबर प्लेट तुटलेली किंवा अस्पष्ट असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. यामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन (आरटीओ) प्रशासनाने अशा वाहनांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पुणेकर नागरिकांकडून केली जात आहे.

शहरातील विविध चौक आणि प्रमुख रस्त्यांवरून विनानंबर प्लेट फिरणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. खास करून अनेक वाहनांच्या मागील बाजूस असलेल्या नंबर प्लेट गायब असल्याचे दै. 'पुढारी'ने केलेल्या पाहणीदरम्यान पाहायला मिळाले.

नियमांना धाब्यावर बसवून वाहन चालवणाऱ्यांमुळे गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांसमोर अडचणी निर्माण होत असून, एखादा अपघात झाल्यास पळ काढणाऱ्या अशा वाहनचालकांचा शोध घेणेही पोलिसांसाठी कठीण ठरत आहे. तसेच, असे अपघात शहरात मुद्दाम घडवले जात आहेत का? असा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे. ही गंभीर समस्या पुणे पोलिस प्रशासन आणि आरटीओ कशा प्रकारे सोडवतात, याकडे लक्ष लागले आहे.

पीटीपी ॲपवर फोटो काढून अपलोड करा; दंड केला जाईल

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनानंबर प्लेट वाहने चालवणाऱ्या विशिष्ट वाहनचालकांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने नागरिकांचे सहकार्य मागितले आहे. अशा प्रकारची वाहने निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ त्याचा फोटो काढून पीटीपी ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. भाजीभाकरे यांनी केले आहे.

विनानंबर प्लेट गाडी चालवणे कायद्याने गुन्हा आहे. आम्ही यासंदर्भात सातत्याने विशेष मोहिमा राबवत असतो. या समस्येची दखल घेऊन आता तत्काळ विशेष मोहीम आयोजित करून अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल.
डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT