अशोक मोराळे
पुणे: पूर्वी सायकलींचे आणि आता दुचाकींचे शहर, अशी पुण्याची नवी ओळख. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हेच शहर आता वाहनचोरांचे शहर म्हणून नवी ओळख करू पाहतेय. मागील साडेचार वर्षांत शहरातून तब्बल 40 कोटी 22 लाख रुपयांची वाहने चोरीला गेली आहेत. त्यापैकी फक्त 16 कोटी 60 लाख रुपयांची वाहने पोलिसांना हस्तगत करता आली आहेत. त्यामुळे पोलिसांपेक्षा वाहनचोर शिरजोर ठरत असल्याचे दिसून येत आहे.
सन 2021 ते 30 जून 2025 या साडेचार वर्षांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांतून वाहने चोरी गेल्याप्रकरणी तब्बल आठ हजार 389 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. त्यापैकी पोलिसांना दोन हजार 963 गुन्ह्यांचा छडा लावता आला आहे. (Latest Pune News)
एकंदरीत, चोरी गेलेल्या वाहनांच्या गुन्ह्यांचे छडा लागण्याचे प्रमाण केवळ 35 टक्केच आहे. म्हणजेच, पोलिसांना अद्यापही 65 टक्के गुन्ह्यांचा छडा लावून वाहने शोधता आलेली नाहीत, तर दुसरीकडे चोरी गेलेल्या वाहनांची किंमत 40 कोटी 22 लाख 27 हजार रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांची किंमत 16 कोटी 60 लाख 24 हजार आहे.
स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी ही वाहने चोरी करण्याचे धाडस करून दाखविले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने वाहन चोर्या रोखण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. शहरात वाहनांची संख्या मोठी आहे.
त्यातही दुचाकीची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुण्यात वाहनचोरीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहन चोरी ही पुणे पोलिसांसमोरील खर्या अर्थाने डोकेदुखी ठरली आहे. एकंदरीत, मागील साडेचार वर्षांत शहरातून चोरी गेलेल्या वाहनांचे विश्लेषण केले, तर प्रत्येक वर्षी वाहन चोर्यांचा आलेख वाढलेला दिसून येतो.
या वर्षाच्या प्रारंभापासूनच चोरांनी वाहनचोरीचा धडाकाच लावल्याचे दिसून आले आहे. 30 जून 2025 अखेर या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल चार कोटी 28 लाख 95 हजार रुपयांची वाहने लंपास केली आहेत. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात 932 गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी केवळ 221 गुन्हे पोलिसांना उघड करता आले आहेत. त्यामुळे शहरातील वाहनचोरीची तीव्रता किती मोठी आहे, हे दिसून येते. वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना म्हणावे तसे यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पथके नेमके करतात काय?
तत्कालीन पोलिस आयुक्तांनी वाहनचोरांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरीविरोधी दोन स्वतंत्र पथके तयार केली. त्यांची उत्तर-दक्षिणमध्ये विभागणी करून कामाचे वाटप केले आहे. पण, या पथकांना वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात म्हणावे तसे यश येताना दिसून येत नाही.
वाहनचोरीविरोधी पथके ही फक्त नावालाच आहेत की काय? असा सवालदेखील यानिमित्त उपस्थित होत आहे. शहरात दररोज सात ते आठ वाहने चोरीला जात असताना ही पथके नेमके करतात काय? हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, वाहनचोऱ्या रोखण्यासाठी वरिष्ठांनाच विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण ढेपाळलेलेच
चोरीच्या वाहनांच्या विक्रीसाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. चोरलेल्या वाहनांचे सुटे भाग करून ते विकले जातात. विदर्भ, मराठवाड्यात आणि ग्रामीण भागांत वाहनांची विक्री केली जाते. जुनी वाहने भंगारात विकली जातात. शहरातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे.
मात्र, त्यातुलनेत पोलिसांना चोरीला गेलेल्या वाहनांचा छडा लावण्यात अर्ध्यापेक्षा कमी यश येताना दिसून येत आहे. शहरातून चोरी केलेली वाहने इतर गुन्हे करण्यासाठी गुन्हेगारांकडून वापरली जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. तर, येथून चोरी केलेली वाहने बाहेरच्या जिल्ह्यात किंवा परराज्यांतदेखील विक्री केली जातात. त्यामुळे त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसून येते.
’परिमंडल 5 व 4’ मध्ये सर्वाधिक गुन्हे
वाहनचोरीबाबत आठ हजार 389 दाखल गुन्ह्यांपैकी परिमंडल पाच आणि चारमध्येच चार हजारपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. परिमंडल पाचमधील हडपसर, मुंढवा, लोणी काळभोर, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरीचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ परिमंडल चारमधील खडकी, विश्रांतवाडी, चतु:सृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ आणि लोणीकंद या पोलिस ठाण्यांतही अधिक गुन्हे घडलेले आहेत.
विमा नसल्याने दिलासा नाहीच
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अलीकडील काही वर्षांत नवीन वाहनांची नोंदणी करताना कारसाठी तीन वर्षे आणि दुचाकीसाठी पाच वर्षे विमा बंधनकारक केला आहे. मात्र, जुन्या वाहनांचे विशेषत: दुचाकीचा विमा काढण्याचे प्रमाण अत्यल्प असते. चोरीला जाणाऱ्या अनेक दुचाकींचा विमा नसल्याने वाहनमालकाला विम्याचा लाभही घेता येत नाही.
कारणे काय आहेत?
दारूची तस्करी करण्यासाठी
घरफोड्या करण्यासाठी
सोनसाखळी चोरी (चेनस्नॅचिंग) करण्यासाठी
वाहने चोरून विक्री करणारी टोळकी
मौजमजा करण्यासाठी 4पान 3 वर