

पुणे: राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसर्या फेरीत कॅप आणि कोटा मिळून एकूण 2 लाख 15 हजार 157 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आता तिसर्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 22 आणि 23 जुलै रोजी प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येणार असून, दुसर्या फेरीअखेर राज्यात अकरावीच्या 14 लाख 20 हजार 764 जागा रिक्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 511 महाविद्यालयांमध्ये 17 लाख 66 हजार 37 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 75 हजार 393 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 41 हजार 430 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 19 हजार 861 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. (Latest Pune News)
त्यापैकी 6 लाख 44 हजार 6 विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे तसेच 1 लाख 16 हजार 260 विद्यार्थ्यांनी विविध कोटाअंतर्गत अशा एकूण 7 लाख 20 हजार 666 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी कॅप प्रवेशाच्या 11 लाख 61 हजार 631 आणि कोटा प्रवेशाच्या 2 लाख 59 हजार 133 अशा एकूण 14 लाख 20 हजार 764 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसर्या फेरीच्या निवड यादीतून 2 लाख 51 हजार 804 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी 1 लाख 74 हजार 308 विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश निश्चित केला, तर राखीव कोट्यातून 40 हजार 849 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यातील 9 हजार 483 कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 21 लाख 37 हजार 550 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
विभागनिहाय आकडेवारीनुसार दुसर्या फेरीत कॅप आणि कोटा प्रवेशाद्वारे अमरावती विभागात 20 हजार 117, छत्रपती संभाजीनगर विभागात 27 हजार 957, कोल्हापूर विभागात 17 हजार 317, लातूर विभागात 13 हजार 738, मुंबई विभागात 55 हजार 965, नागपूर विभागात 21 हजार 518, नाशिक विभागात 22 हजार 126, तर पुणे विभागात 36 हजार 421 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
आता तिसर्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार 22 ते 23 जुलैदरम्यान तिसर्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम (प्रवेश अर्जाचा भाग 2) विद्यार्थ्यांना नोंदवता येणार आहेत. तर 26 जुलैला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना 26 ते 28 जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे. तर 30 जुलैला चौथ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.