Investment Fraud Pudhari
पुणे

Pune Investment Fraud Scam: पुण्यात 43 कोटींचा घोटाळा; व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक फरार

जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केल्याच्या प्रकरणात व्हॅलेंटिना इडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोरगे हे दोघे फरार झाले आहेत. गुरुवारी या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. या कंपनीचे कार्यालय देखील बंद आहे. तसेच या कंपनीचे 30 कोटी गोठविण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

याप्रकरणी संतोष नाथा बांदल आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे यांच्यासह इतर साथीदारांवर ‌’बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंधक अधिनियम‌’ आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील कर्वे रस्ता परिसरातील ‌’व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड‌’ या कंपनीने तब्बल 43 कोटी 19 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीला त्यांच्याकडे पोलिसांनी छापा मारून चौकशी केली. मात्र, जेव्हा दुसऱ्यांदा त्या दोघांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले तेव्हा ते फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कर्वे रोडवरील सक्सेस स्क्वेअर इमारतीत ‌’व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड‌’चे कार्यालय थाटले होते. जुलै 2022 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आरोपींनी सोशल मीडिया, व्हिडीओ आणि पत्रकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.

‌‘आमच्या कंपनीत गुंतवणूक करा आणि दरमहा 5 टक्के परतावा मिळवा,‌‘ असे आमिष त्यांनी लोकांना दाखवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी आपली कंपनी अत्यंत नफ्यात असल्याचे भासविण्यासाठी खोट्या बॅलन्स शीट आणि ऑडिट रिपोर्टचा आधार घेतला. कंपनीची उलाढाल (टर्नओव्हर) 300 कोटी रुपये असून, कंपनीच्या 11 उपकंपन्या कार्यरत असल्याचे सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्षात या कंपनीला कोणताही नफा होत नसताना, केवळ नवीन गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून देऊन हा प्रकार सुरू ठेवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

2000 लोकांची गुंतवणूक

आतापर्यंत सुमारे 2000 लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी आरबीआय किंवा सेबीची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ठेवी स्वीकारल्या. गुंतवणूकदारांना पार्टनरशिपचे आमिष दाखवले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांचे पैसे वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‌‘नागरिकांनी अशा कोणत्याही जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये आणि गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची अधिकृतता तपासावी,‌‘ असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोरक्ष घोडके करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT