

पुणे: शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 23) संपूर्ण बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी येईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांत पाणीच न आल्याने नागरिकांमध्ये तीव नाराजी पसरली. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याच्या विस्कळीततेवरून जोरदार गदारोळ झाला. नगरसेवकांनी प्रशासनाच्या नियोजनावर तीव टीका करत प्रश्नांचा भडीमार केला.
नगरसेवक कुणाल टिळक यांनी गुरुवारपासून पाणीपुरवठा बंद असून, शुक्रवारी दुपारपर्यंतही अनेक भागांत पाणी मिळाले नसल्याची तक्रार मांडली. टँकरही उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी नमूद करत, “शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा सुरू ठेवावा,” अशी मागणी केली.
नगरसेवक कासिफ सय्यद यांनी मिठानगर, अश्रफनगर, कौसरबाग आणि एनआयबीएम परिसरात केवळ एक तास पाणीपुरवठा होत असून तेही दूषित असल्याचे सांगत प्रशासनावर टीका केली. “पाणीपुरवठा सुरळीत नसताना बांधकाम परवानग्या कशा दिल्या जातात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नगरसेवक योगेश मुळीक यांनी वडगावशेरी परिसरात सर्व पायाभूत कामे पूर्ण असूनही पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. “सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून लाखो रुपयांची बिले येत आहेत. हा आर्थिक भार नागरिकांनी का सहन करावा?” असा सवाल त्यांनी केला.
नगरसेवक काका चव्हाण यांनी 24 ु7 पाणीपुरवठा योजनेबाबत प्रश्न उपस्थित करत, जुन्या व नव्याने समाविष्ट गावांना प्रत्यक्षात किती पाणी दिले जाते, याची माहिती मागितली. “अनेक ठिकाणी फक्त अर्धा तास पाणी दिले जाते, म्हणजेच प्रतिव्यक्ती पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे,” असे त्यांनी नमूद केले.
नगरसेविका धनश्री कोल्हे यांनी नांदेड फाटा ते नंदोशी परिसरात केवळ 20 मिनिटे आणि तेही दूषित पाणी येत असल्याची तक्रार करत संपूर्ण पाइपलाइन बदलण्याची मागणी केली. नगरसेवक दादा कोद्रे यांनी केशवनगर, शेवाळवाडी आणि मांजरी भागात मंजूर क्षमतेपेक्षा अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. “12 एमएलडी मंजूर असताना केवळ 4 एमएलडी पाणी दिले जाते,” असा आरोप त्यांनी केला.
नगरसेवक सुनील शिंदे यांनी धरणांमध्ये पुरेसे पाणी असतानाही नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगितले. तर नगरसेवक पुनीत जोशी यांनी पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना एसएमएसद्वारे माहिती देण्याची मागणी केली. नगरसेविका स्वरदा बापट यांनी “सकाळपासून पाणी नाही आणि प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नाही,” अशी तक्रार करत 24/7 पाणीपुरवठा योजनेला गती देण्याची गरज व्यक्त केली.
नगरसेविका अनिता इंगळे यांनी “धरण उशाला, पण घसा कोरडा” अशी स्थिती असल्याचे सांगत काही भागांत पाच ते सहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याची गंभीर बाब मांडली. गळती, अपूर्ण जलसाठे आणि टँकर व्यवस्थेतील गोंधळ यावरही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
विलंबाबद्दल प्रशासनाची दिलगिरी
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तारु यांनी 23 एप्रिल रोजी जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत कामे आणि फ्लो मीटर बसवण्याच्या प्रक्रियेमुळे पाणीपुरवठ्यात पाच ते सहा तास विलंब झाल्याचे स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली.
खासगी टँकर चालकांच्या संपामुळे नियोजित क्लोजर पुढे ढकलावे लागले. त्यामुळे गुरुवारी 45 मोठी कामे एकाचवेळी हाती घेण्यात आली. ही कामे शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होती. शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल
पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका