पुणे : ऑनलाइन शॉपींग साईच्या माध्यमातून घरगुती सामान घरी पोहचविण्यासाठी जात असलेल्या डिलिव्हरी बॉयला मद्यधुंद चालकाकडील भरधाव वेगातील कारने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज रोड येथील क्रिकेटच्या मैदानाजवळ घडला. धडक देणारी कार त्याला मदत न करताच निघून गेल्याने डिलिव्हरी बाॅयचा मृत्यू झाला.
राहुल दिनकर पवार (वय 30, रा. मु. पो. पाटण, ता. सिंदखेडा, जि. धुळे) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी सोजल शामराव औटी (वय 22, रा. शेलपिंपळगाव, आळंदी), अभिषेक संजय शिंदे (वय 21, रा. कोळणे फाटा, आळंदी) आणि विघ्नहर्ता शामराव औटी (वय 27, रा. शेलपिंपळगाव, आळंदी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हा अपघात 10 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत राहुलचा मित्र कैलास विक्रम डोईफोडे (वय 46, रा. धायरी रोड, गोकुळनगर) याने फिर्याद दिली आहे. याबाबत तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक माधुरी काजळे यांनी सांगितले, कारमधील तीन आरोपींना अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत आरोपी कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर राहुल हा मुळचा धुळे येथील रहिवासी असून मागील दोन वर्षांपासून कामासाठी तो पुण्यात आला होता. डिलिव्हरी बॉयचे काम करून तो स्वतःची उपजिविका भागवत घरी पैसे पाठवत होता. राहुलच्या गावाकडे याबाबत माहिती दिली असून त्याचे घरचे पुण्यात येत आहेत.