पुणे: रविवारी पहाटे शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात सरासरी ५ ते ७ मि.मी पाऊस बरसला. सर्वाधिक पाऊस मगरपट्टा भागात १८ मि.मी इतकी नोंद झाली. दरम्यान, सोमवार आणि मंगळवारी देखील शहरात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मुरासू या चक्रीवादळामुळे शहरात बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते मात्र पाऊस बरसला नाही. रविवारी पहाटे ५ ते ६ या वेळेत शहरातील काही भागात कमी-जास्त वेगाने पाऊस झाला. पहाटेची वेळ असल्याने पावसाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. शहरातील मगरपट्टा, हडपसर, कात्रज या भागात जास्त जोर होता.
रविवारी रात्री सव्वाआठ ते सकाळी साडेआठच्या दरम्यान अचानक जोरदार पावसाच्या सरींनी शहरात हजेरी लावली. रविवारी पहाटे पाच ते सहा वाजता झालेल्या पावसाने वातावरण दिवसभर गार झाले होते. दिवसभर कडक ऊन पडले होते.
सायंकाळी पुन्हा गारवा जाणवू लागला आणि रात्री अचानक जोरदार पावसाने वाहनधारकांसह विक्रेत्यांची आणि दिवाळीची खरेदी करण्यासाठी निघालेल्या पुणेकरांची तारांबळ उडवून दिली. या पावसाने रस्ते जलमय झाले. सखल भागांत पाणी साचले आणि गारवा सुटला. ५ नोव्हेंबरपर्यंत शहरात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.