Pune Unseasonal Rain Pudhari
पुणे

Pune Unseasonal Rain: पुण्यात अवकाळी पावसाचा धडाका; खराडी-चंदननगरमध्ये गारपीट

वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुढील तीन दिवसांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहर आणि परिसरात बुधवारी सांयकाळच्या सुमारास वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, खराडी आणि चंदननगर भागात गारपीट झाली. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दैना उडाली, तर रस्त्यावर ओढ्यासारखे पाणी वाहताना दिसत होते. पुढील तीन दिवस दुपारनंतर अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिमी चक्रवात, बिहार, उत्तर महाराष्ट्र पार करून गेलेला कमी दाबाचा पट्टा, यामुळे पुण्यासह परिसरात अवकाळी पाऊस जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हजेरी लावत आहे.

शहरात बुधवारी सकाळपासून ऊन चांगलेच तापले होते. घामाच्या धारा निघत होत्या. मात्र, दुपारनंतर अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली होती.

अनेकांना पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाचा आधार घ्यावा लागला, तर रस्त्यावर फळे, भाजीपाला आणि इतर वस्तू विकणाऱ्या नागरिकांची पळापळ झाली. दरम्यान, काही भागांत किरकोळ झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, पुढील तीन दिवस दुपारनंतर अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

महंमदवाडी परिसरात गारांचा वर्षाव

वानवडी, महंमदवाडी परिसरात बुधवारी (दि. 1) सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. अचानकपणे रस्त्यावर गारा पडल्यामुळे रस्ते पांढरेशुभ दिसत होते. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे या पावसामुळे हाल झाल्याचे दिसून आले. बुधवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले. जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे पावसाने तुफान बॅटिंग केली. रस्ते जलमय झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. भाजी व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडून गेली. उशिरापर्यंत हा पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

कात्रजमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ‌‘अवकाळी‌’

परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कात्रज, सुखसागरनगर, आंबेगाव, दत्तनगर, गुजरवाडी आदी भागांत पावसाने चांगलीच जोरदार बॅटिंग केली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही वाढल्याने झाडांच्या फांद्या हलताना दिसल्या. विजांच्या कडकडाटामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झाल्याचे चित्र दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT