पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या परिपत्रकांविरोधात सोमवारी (दि.२) विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मुख्य इमारत परिसरात दुपारी बारानंतर एका संघटनेने, तर ४ वाजल्यानंतर अन्य संघटनांनी ठिय्या मांडला आणि विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला.
विविध पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘कुलसचिव कुठे मिळतील? आरएसएस दप्तरात’, ‘व्यवस्थापन परिषद कुठे मिळेल? आरएसएस दप्तरात’, ‘कुलसचिव हटवा’, ‘परिपत्रक मागे घ्या’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘आंबेडकर आंबेडकर’ अशा घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेला.
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर मर्यादा आणणारी परिपत्रके जारी केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. यामध्ये परिपत्रक क्रमांक ३१६/२०२४ आणि २२६/२०२६ यांचा समावेश असून, ही परिपत्रके विद्यार्थ्यांच्या आंदोलन, सभा, मोर्चे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणणारी असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने कुलगुरूंना निवेदन देत संबंधित परिपत्रके तत्काळ मागे घेण्याची मागणी केली होती.
व्यवस्थापन परिषदेत उमटणार पडसाद
व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनासंदर्भातील निर्णय हा व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यात बदल करण्याचा अधिकार कुलगुरू, तसेच प्र-कुलगुरूंना नाही. तसेच येत्या ४ नोव्हेंबरला व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. यामध्ये संबंधित निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्यात येईल आणि आंदोलनासंदर्भातील एक एसओपी ठरविण्यात येणार असून, ती जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.