Pune University Protest Ban Pudhari
पुणे

Pune University Protest Ban: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलने, मोर्चांना यापुढे बंदी!

विद्यापीठ आवारात अनुचित घटना होऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या एका ठरावाच्या आधारे यापुढे विद्यापीठ परिसरातील सभा, मोर्चे, आंदोलने आणि निदर्शनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन, सभा घेता येणार नसल्याचा निर्णय विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. परंतु, या निर्णयामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

विद्यापीठाच्या या निर्णयाचा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, एसपीपीयू युनिटने तीव्र निषेध केला आहे. हे परिपत्रक तातडीने रद्द करावे, अशी मागणी समितीने केली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ (१)(अ) आणि १९ (१)(ब) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततेने सभा घेण्याचा अधिकार संरक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांचा सन्मान राखला पाहिजे, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

या परिपत्रकात सीजेपी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि इतर शिव-बिरसा-फुले-शाहू-आंबेडकरी व पुरोगामी संघटनांचा उल्लेख असल्याने समितीने पक्षपातीपणाचा सवाल उपस्थित केला आहे. ‘’हा नियम सर्व संघटनांना समान लागू आहे का? सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटनांसाठीही हेच नियम आहेत का? विद्यापीठाने पारदर्शक भूमिका स्पष्ट करावी,’’ अशी मागणी करण्यात आली आहे.

एकीकडे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २४ सप्टेंबरला राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्यासाठी समिती गठित केली आहे, तर दुसरीकडे विद्यापीठाने आंदोलनावर बंदी घालणे, हा विरोधाभास असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहे निर्णय..

विद्यापीठाशी प्रत्यक्ष निगडीत नसलेल्या राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न अथवा इतर व्यापक स्वरुपाच्या विषयाच्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शन, आंदोलन, सभा, मोर्चासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवाराचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

अनेक प्रसंगी पोलिस प्रशासनाने त्यांना परवानगी दिल्याचे देखील निदर्शनास आले. अशा प्रकारच्या निदर्शने, आंदोलन, सभा, मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होणारे निदर्शक, आंदोलकांमुळे विद्यापीठ आवारात अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने आणि शैक्षणिक प्रक्रियेत निर्माण होणारी बाधा विचारात घेऊन अशा प्रकारची निदर्शने आंदोलन सभा, मोर्चांना व विविध राजकीय पक्ष, संघटना, गट व या विषयाशी संबंधीत इतर सर्व व्यक्ती, संघटनांना यापुढे विद्यापीठ आवारात परवानगी देण्यात येणार नाही.

शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या सर्व विद्यार्थी संघटना, पुरोगामी संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन या परिपत्रकाचा निषेध नोंदवावा, विद्यार्थ्यांचा आवाज दडपू नका, लोकशाही अबाधित ठेवा.
-अभिषेक शेलकर, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समित
सर्वप्रथम आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रातील सर्व शिव-फुले-शाहू-आंबेडकरी व पुरोगामी चळवळीतील नेते मंडळी कार्यकर्ते आणि अभ्यासकांना नम्र विनंती करतो की, आपण सर्वांनी या निर्णयाचा जाहीर निषेध व विरोध करावा. हा तुघलकी निर्णय तत्काळ रद्द करण्यासाठी भाग पाडावे.
-डॉ. राहुल ससाणे, आंबेडकरी कार्यकर्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT