Pune University Food Issue Pudhari
पुणे

Pune University Food Issue: पुणे विद्यापीठात फूड कोर्टमध्ये अळ्या-झुरळांचा धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांचा संताप

जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी; मेस व कॅन्टीनवर अचानक तपासणीची विद्यार्थ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कोर्टासह अन्य मेसमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणात सर्रास अळ्या, झुरळे निघत आहेत, परंतु याकडे डोळेझाक करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे, तर तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेसमालक आणि कर्मचाऱ्यांकडून धमकावले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठातील जेवण आणि नाश्त्याची गुणवत्ता प्रचंड ढासळली आहे. अन्नामध्ये अळ्या, माश्या आणि झुरळे सर्रास सापडत आहेत. चपातीसाठी वापरण्यात येणारे पीठ अत्यंत खराब आणि भेसळयुक्त आहे, ज्यामुळे चपातीला आंबट/खराब वास येतो. स्वयंपाकघर आणि कॅन्टीन परिसरात अजिबात स्वच्छता नाही. याविरोधात विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलने केली. तरीही विद्यापीठ प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत. उलट ठराविक व्यक्तींनाच कॅन्टीन आणि मेसचे कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहे.

दरवाढ करूनही अन्नाचा दर्जा सुधारलेला नाही. कॅम्पसमध्ये हजारो विद्यार्थी याच मेस आणि कॅन्टीनवर अवलंबून आहेत. निकृष्ट अन्नामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विद्यापीठाच्या सर्व मेस व कॅन्टीनला अचानक भेट द्यावी, येथील अन्नाचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी आणि दोषी कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

फूड कोर्टातील उपम्यात अळी आढळण्याची घटना ही अपवादात्मक नसून गेल्या २० दिवसांतील चौथी गंभीर घटना आहे. अळी, घासणी यांसारखे प्रकार वारंवार समोर येत असताना अन्नसुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अभिषेक शेलकर, सदस्य, भोजनगृह व गुणवत्ता नियंत्रण समिती
फूड कोर्टातील स्वराजकी प्रांजली केटरर्स (स्नॅक्स) स्टॉलवरून घेतलेल्या उपम्यामध्ये पूर्णपणे भाजलेली अळी आढळली. ही बाब स्टॉलचालकाच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी ती मान्य करण्यास टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर घटनांची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
अभिषेक आढाव, विद्यार्थी
गेल्या १५ ते २० दिवसांत विद्यापीठातील मेस व कॅन्टीनमध्ये अळी, किडे आणि इतर हानिकारक पदार्थ आढळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भोजन व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून, अनेक विद्यार्थ्यांना मेसचे जेवण सोडून महागड्या खासगी टिफिन सेवांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
श्रीकांत कांबळे, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT