पुणे : शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरातील सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. मात्र, या मोहिमेत प्रशासनाकडून स्पष्ट भेदभाव होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गुन्हे केवळ व्यावसायिक फ्लेक्स लावणाऱ्यांवर दाखल केले जात असून, राजकीय फ्लेक्सबाजी करणाऱ्यांना मात्र अभय दिले जात आहे.(Latest Pune News)
शहरातील प्रमुख रस्ते, विद्युत खांब, सिग्नलचे खांब, सार्वजनिक चौक आणि उघड्या जागांवर अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर उभारले जातात. हे फ्लेक्स वाढदिवस, शुभेच्छा, सण, कार्यक्रम यासाठी लावले जात असून, अनेक ठिकाणी ते धोकादायक पद्धतीने बसवलेले असतात. या फ्लेक्समुळे केवळ शहराचे सौंदर्य विद्रूप होत नाही, तर पालिकेच्या उत्पन्नाचेही नुकसान होते.
आगामी महापालिका निवडणुका आणि दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय इच्छुकांकडून फ्लेक्सबाजीचा अक्षरशः पूर आला आहे. नागरिकांनी याविरोधात तक्रारी केल्यानंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांनी फ्लेक्स विरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून, महापालिकेचे तीनही अतिरिक्त आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईचे नेतृत्व करत आहेत.
अधिकाऱ्यांना थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार 27 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, 71 जणांविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये एकाही राजकीय नेता अथवा इच्छुक उमेदवाराविरुद्ध कारवाई झालेली नाही.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, ‘शहरातील अनधिकृत फ्लेक्सपैकी सर्वाधिक प्रमाण राजकीय फ्लेक्सचे असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे “राजकीय फ्लेक्सबाजांना अभय, व्यावसायिकांना शिक्षा व राजकीय नेत्यांना अभय अशी दुट्टप्पी वागणूक पालिकेची असल्यास शहर फ्लेक्समुक्त कसे होणार?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.