पुणे: श्रीगणरायाचा आवडता हा मोदक आता केवळ पुण्यातील घराघरांतच नव्हे, तर सातासमुद्रापारही पोहोचत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पारंपरिक उकडीच्या मोदकांना परदेशातील मराठी भाषकांकडून मोठी मागणी होत असून, फ्रोजन उकडीचे मोदक हे मलेशिया, सिंगापूर, इंग्लंड, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, अशा विविध देशांमध्ये पाठविण्यात येत आहेत. या मोदकांसह तळणीचे तसेच काजू, मावा, चॉकलेट, पिस्ता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनाही पसंती मिळत असून, अनेक व्यावसायिकही पुण्यातून परदेशात मोदक आणि प्रसाद कुरिअरद्वारे पाठवीत आहेत. काही व्यावसायिकांनी आठवडाभरापूर्वीच मोदक पाठविण्यास सुरुवात केली आहे.
गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांसह विविध प्रकारचे मोदक नैवेद्याचा अविभाज्य भाग असतात. पुण्यातील पारंपरिक हातवळणीच्या उकडीच्या मोदकाची चव परदेशात राहणाऱ्या मराठी भाषकांनाही हवीहवीशी वाटते. त्यामुळे सिंगापूरपासून ते दुबईपर्यंत...अशा विविध ठिकाणी फ्रोजन उकडीचे मोदक पाठविले जात आहेत. फ्रोजन उकडीच्या मोदकांना दर वर्षी परदेशातून मोठी मागणी असते. श्रीगणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी बाप्पाचे स्वागत मोदकांनी होणार आहे.
काही व्यावसायिकांनी तर विविध देशांत जवळपास ६० हजारांहून अधिक मोदक पाठविले आहेत. तर, काही व्यावसायिकांकडून उत्सवातील दहा दिवसांसाठी आताही मोदक पाठवत आहेत. उत्सवातील मोदकाच्या या परदेशवारीमुळे पुण्याची पारंपरिक खाद्यसंस्कृतीही सातासमुद्रापार पोहोचत आहे. घरच्या गणपतीसमोर नैवेद्याला ठेवला जाणारा उकडीचा मोदक आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या मराठी भाषकांच्या घरातही गणरायाच्या प्रसादाची गोडी निर्माण करणार आहे.
याविषयी पुणे रेस्टॉरंट ॲण्ड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, की दर वर्षी पुण्यातून मोठ्या प्रमाणात फ्रोजन उकडीचे मोदक मोठ्या प्रमाणात मागविले जातात. आम्ही सिंगापूर, लंडन, दुबई, मलेशिया आणि मॉरिशस आदी ठिकाणी मोदक पाठविले आहेत. मागील आठवड्यात सुमारे ६० हजार मोदक परदेशात रवाना झाले.
परदेशातील मराठी भाषकही मोदकांच्या पारंपरिक चवीला अधिक महत्त्व देत असल्याने फ्रोजन उकडीचे मोदक मोठ्या प्रमाणावर पाठविले जात आहेत. उकडीच्या मोदकांसह काजू, मावा, चॉकलेट, पिस्ता यांसह विविध प्रकारचे मोदकही परदेशात पाठविले जात आहेत. फ्रोजन उकडीचे मोदक हे नऊ महिने टिकतात. मात्र, वाहतुकीदरम्यान योग्य तापमान राखणे महत्त्वाचे असल्याने हे मोदक विशिष्ट प्रकारच्या पॅकिंगद्वारे आणि शीतपेटीतून विमानाने विविध देशांत पाठविले जातात. त्यामुळे त्यांची चव आणि गुणवत्ता कायम ठेवण्यास मदत होते.
पुण्यातून फ्रोजन उकडीच्या मोदकांना परदेशातून मागणी आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये मोदक पाठविण्यात येत आहेत. कुरिअरद्वारे हे मोदक परदेशात पाठवत आहोत.दीपक नाडकर्णी, एका कुरिअर कंपनीचे संचालक