प्रसाद जगताप
पुणे: राज्यभरातील लहान-मोठ्या शहरांना हवाई वाहतुकीने जोडण्याच्या ‘उडान’ योजनेच्या या मोहिमेत पुणे विमानतळाला मोठा प्रतिसाद मिळत असून, जुलै आणि ऑगस्ट २०२६ या दोन महिन्यांत पुण्याहून तब्बल ३४७ विमानांच्या फेऱ्यांद्वारे १९ हजार ३०५ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
केंद्र सरकारच्या ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेवर आधारित ‘उडान’अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या आरसीएस अर्थात प्रादेशिक संपर्क योजनेला (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) पुण्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे विमानतळ प्रशासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या योजनेमुळे राज्यातील आणि परराज्यांतील प्रादेशिक प्रवासाला मोठी चालना मिळाली आहे. ‘उडे देश का आम नागरिक’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात जलद विमान प्रवास शक्य झाला आहे.
पुण्याहून जोडली गेलेली प्रमुख शहरे आणि प्रवासीसंख्या
जळगाव : पुण्याहून खान्देशाला जोडणाऱ्या या मार्गाला सर्वाधिक पसंती मिळाली असून, १०१ फेऱ्यांमधून ५,३८५ प्रवाशांनी (आगमन २,८२५, प्रस्थान २,५६०)
प्रवास केला आहे.
किशनगड : पुण्याहून राजस्थानमधील या औद्योगिक शहरासाठी ७२ फेऱ्यांतून ५,१०० प्रवाशांची (आगमन २,१७७, प्रस्थान २,९२३) वाहतूक झाली.
सिंधुदुर्ग : कोकणातील पर्यटनाला गती देणाऱ्या या मार्गावर १०२ फेऱ्यांमधून ४,६३९ प्रवाशांनी (आगमन २,०३४, प्रस्थान २,५६५) विमान प्रवासाचा आनंद घेतला.
नांदेड : मराठवाड्याशी थेट संपर्क जोडणाऱ्या या सेवेचा ७२ फेऱ्यांतून ४,२२१ प्रवाशांनी (आगमन २,२५०, प्रस्थान १,९७१) लाभ घेतला.
...असा झाला एकूण प्रवाशांचा उडान योजनेअंतर्गत प्रवास
एकूण प्रवाशांपैकी पुण्यात ९,२८६ प्रवाशांचे आगमन झाले, तर पुण्यातून विविध शहरांकडे १०,०१९ प्रवाशांनी प्रस्थान केले. राज्याच्या ग्रामीण व निमशहरी भागांना पुण्यासारख्या प्रमुख आर्थिक केंद्राशी जोडण्यात ‘उडान’ योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे. यामुळे राज्यातील उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला नवे बळ मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेमुळे प्रादेशिक हवाई प्रवासाला मोठी दिशा मिळाली आहे. केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि सततच्या पाठपुराव्यामुळे पुणे विमानतळावरून विविध शहरांसाठीच्या सेवा अधिक सक्षमपणे सुरू आहेत. तसेच, नवीन सेवा सुरू करण्याचे देखील नियोजन सुरू आहे. ‘उडे देश का आम नागरिक’ हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी विमानतळ प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना उत्तम सोयी-सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात या प्रादेशिक मार्गांना मिळणारा प्रतिसाद पाहून आणखी नवीन शहरे जोडण्याचा आमचा मानस आहे.संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ