पुणे: तुळापूर परिसरातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये रंगलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ मद्यधुंद पार्टीत केवळ धनदांडगे आणि तरुणाईच नव्हे, तर बंडगार्डन पोलिस ठाण्यातील एक ‘वजनदार’ कारभारी देखील हजेरी लावण्यासाठी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलिसच जर अशा बेकायदा पार्टीत सहभागी होण्यास जात असतील, तर नक्कीच हा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कारभाऱ्याला मिल्स परिसरातील रात्रीच्या पार्ट्या आणि साग्रसंगित 'मैफिली'ची विशेष आवड असून, या परिसरातील त्याचे नेटवर्क चांगलेच मजबूत आहे. हा कारभारी व त्याचा साथीदार मिल्स्च्या विशाल- सागरात नेहमीच डुबलेले असतात. कारभाऱ्याच्या कामाचा आवाका तसेच मिल्स परिसरातील संपर्क दांडगा आहे. त्यातूनच हा कारभारी या पार्टीला हजेरी लावण्यासाठी गेला असल्याचे समजते. शिवाय रात्री हॉटेल्स, पब बंद करण्याच्या नावाखाली हे कारभारी मिल्स परिसरात पडीकच असतात. त्यांच्याशिवाय कोणी या आस्थापना बंद करू शकते की नाही, अशी शंका कदाचित प्रभारी अधिकाऱ्यांना असावी.
दरम्यान, याच वेळी तो गुन्हे शाखेच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडला. 'इथे काय करतोयस?' असा सवाल गुन्हेशाखेच्या कर्मचाऱ्याने करताच, 'नाही... असाच आलो होतो,' अशी सारवासारव कारभाऱ्याने केल्याचे समजते. पार्टीवर छापा टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, 'उगीच भलत्या धंद्यात कशाला पडतोस?' अशी कानउघाडणी करत त्याला तेथून निघून जाण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच संबंधित कारभाऱ्याने तेथून काढता पाय घेतला.
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर येथे फार्महाऊसवर अनधिकृत रेव्ह पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. सात जून रोजी पहाटे अडीच वाजता १५ अधिकारी आणि ६५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित रिसॉर्टवर छापा टाकला. अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली होती. उच्चशिक्षित तरुण- तरुणी या पार्टीत मध्यरात्रीपर्यंत झिंगलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आले होते. तसेच, काही अल्पवयीन मुले या पार्टीत आढळून आली होती. तपासात मद्यसेवनासाठी घेण्यात आलेला परवाना ६ जून रोजी रात्री साडेअकरा वाजेपर्यंतच वैध होता. मात्र, परवान्याची मुदत संपल्यानंतरही पहाटेपर्यंत ही पार्टी सुरू होती. या प्रकरणात पार्टीचे आयोजन करणारे यश राजा चौधरी (वय २६, देवलिंग सोसायटी, गावडे पेट्रोल पंपाजवळ, चिंचवड), एैमनं सैफ शेख (वय २७, सिटी टॉवर्स, कौसरबाग, कोंढवा) यांच्यासह सैफ आसिफ सय्यद, सिद्धांत संतोष धुवाडी, दिशांत संतोष धुवाडी, अली रौफ पानसरे, आवेश समशुलहक अन्सारी यांच्यासह ७८ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
हे गंभीरच...
तुळापुरात झालेल्या प्रोजेक्ट एक्स पार्टीमुळे शहरात बेकायदा होणाऱ्या मद्यधुंद पार्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. असे असताना, एक पोलिस कर्मचारी या पार्टीत सहभागी होण्यास जातो हे तर अतिशय गंभीर आहे. एकंदर पाहिले तर या पोलिसाला प्रोजेक्ट एक्स पार्टी नियमांचे उल्लंघन करून होत असल्याची अगोदरच कल्पना होती का? हा देखील मोठा सवाल आहे. खरंतर या पोलिसाने ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे गरचेचे असताना, तोच या पार्टीत पोहचल्याची माहिती आहे. अशातच आता या कारभाऱ्याला एक वर्षाची बंडगार्डन पोलिस ठाण्यात परत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.