पुणे: अंगारक संकष्ट चतुर्थीमुळे शहराच्या मध्य भागात गणेशभक्तांची प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीत बदल केले. परंतु, वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे महत्त्वाचे रस्तेच कोंडले गेल्याने पुणेकरांचे मंगळवारी (दि. 12) जबरदस्त हाल झाले. दुपारपासूनच शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यासह उपरस्त्यांवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती.
अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त वाहतूक प्रशासनाने मध्य भागातील वाहतुकीत बदल करूनही झालेल्या कोंडीमुळे प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसही सिग्नल बंद करून हातवारे करण्यापलीकडे काही करू शकले नाहीत.
बाजीराव रस्ता पार करण्यासाठी एरवी सात ते आठ मिनिटांचा वेळ लागतो. मंगळवारी मात्र त्यासाठी चक्क 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागला. मध्य भागातील महत्त्वाचा रस्ता असलेला हा रस्ताच कोंडीत अडकल्याने त्याला जोडणारे रस्तेही बंद झाले. त्यामुळे येथे निर्माण झालेला वाहतूक कोंडीचा फुगवटा शनिवार पेठ, नारायण पेठ तसेच पुणे महापालिका परिसरापर्यंत गेला होता.
वाहतुकीच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवजड वाहनांसह चारचाकी वाहनांसाठी रस्ते बंद करत पर्यायी मार्ग सुचविले. मात्र, बेशिस्त वाहनचालकांनी त्याला केराची टोपली दाखविल्याने त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागला. शिवाजी रस्त्यासह बाजीराव रस्ता व लगतच्या रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडली.
गणेशभक्त हव्या तशा गाड्या लावून दर्शनासाठी जाताना दिसून आले. पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल करीत काही रस्ते नो-पार्किंग झोन केले असते व त्याची काटेकोर अंमलबजावणी केली असती तर वाहतूक कोंडी झाली नसती, असे मत व्यक्त करीत पुणेकरांनी पोलिस प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी तसेच रोष व्यक्त केला.
दर्शनाला कुटुंब गेले का?
शहरातील मध्य भागातील वाहतुकीच्या बदलामुळे या परिसरात चारचाकी वाहनांसाठी बंदी करण्यात आली होती. मात्र, तरीही या रस्त्यावर चारचाकींची वर्दळ सुरू राहिली. तर, बहुतांश भाविकांनी चारचाकी रस्त्यालगत उभी करून कुटुंबीयांना दर्शनासाठी पाठविले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या थांबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी गाडी इथे का थांबविली आहे, असा प्रश्न हतबल पुणेकरांनी विचारला. त्या वेळी कुटुंब दर्शनाला गेले असल्याचे उत्तर मिळाले.