पुणे : पुणे-नगर रस्त्यावरील येरवडा येथील मुळा-मुठा नदीवरील तारकेश्वर पुलाच्या एक्सपान्शन जॉइंटवरील डांबर आणि सिमेंट काँक्रीट फुटल्यामुळे मोठा खड्डा पडला आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड लावून हा पूल वाहतुकीसाठी तीन दिवस बंद केला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. मात्र, पूल बंद असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
तारकेश्वर पुलावर गुरुवारी सकाळी एक्सपान्शन जॉइंटवरील डांबर व सिमेंट काँक्रीट फुटल्यामुळे मोठा खड्डा पडला. परिणामी, या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी पुलावर खड्डा पडलेल्या ठिकाणी बॅरिकेड लावले. मात्र, पूल वाहतुकीसाठी खुला ठेवला होता. मात्र, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे पुलाला हादरे बसत होते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्याने पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने पुलाचे काम पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांची संरचनात्मक स्थिरता व टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी एक्सपान्शन जॉइंटचे काम करण्याचा निर्णय घेतल घेतला असून, या पुलाचे देखील काम केले जाणार आहे. या पुलाचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. एक्शपान्शन जॉइंटचे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट करण्यात आले. मात्र, वर्दळ असल्याने हा पूल वाहतुकीसाठी अपेक्षित वेळेच्या आधीच खुला करण्यात आला. डांबरीकरण व सिमेंट कॉंक्रिटीकरण निष्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा खड्डा पडल्याची माहिती महापालिकेने दिली.
हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्याने गुंजन चौकापासून पुलाच्या मध्यापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याचा त्रास वाहनचालकांना झाला. या मार्गावर वाहकांच्या रांगा लागल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
येरवडा परिसर व शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याची सातत्याने देखभाल व डागडुजी होणे गरजेचे आहे. तारकेश्वर पुलावर पुणे स्टेशनकडे तसेच कोरेगाव पार्क भागात जाता येते, तर याच पुलावरून पिंपरी-चिंचवडकडून मुंबई महामार्गावर जाता येते.
तारकेश्वर पुलावरील एक्सपान्शन जॉइंटचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट केल्यानंतर हा पूल लगेच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे जॉइंटच्या भागातील डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट खराब झाले. त्यामुळे आता पुलाच्या जॉइंटचे काम पुन्हा केले जाणार आहे. दुरुस्तीनंतर हा पूल वाहतुकीसाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.