

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तिसऱ्या दिवशीही अनधिकृत दुकाने आणि पथारीवाल्यांवर कारवाई केली. ही कारवाई भवानी पेठ व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शुक्रवारी करण्यात आली.
यासह परिमंडळ पाच अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दोन्ही बाजू, शनिवार वाडा ते स्वारगेट चौक रस्ता भागातील पदपथ व फ्रंट तसेच साइड मार्जिनमधील अनधिकृत बांधकाम व पथारींवर देखील बुलडोजर चालवण्यात आला.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम परवाना विभागातर्फे ही संयुक्त कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे व परिमंडळ उपायुक्त सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त किसन दगडखैर व सुहास जाधव यांच्या नेतृत्वात अतिक्रमांवर बुलडोजर चालवण्यात आला.
विजय कुमावत, अभय शिंदे, उमेश नरुले, श्रीकृष्ण सोनार, सुभाष जगताप, नीलेश चव्हाण, शरद मरकड, राहुल महाजन, अविनाश इंगोले आदींच्या पथकाने कारवाई करत सुमारे साडेपाच हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे केले. या कारवाईत टेबल,खुर्च्या, मंडप, काउंटर असे सुमारे ८ ट्रक पथारी साहित्य जप्त करण्यात आले. शहराच्या विविध भागात ही कारवाई सुरू राहील, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले.
नगर रस्ता वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील खराडी झेन्सार आयटी पार्क परिसरातील व खराडी मुंढवा बायपास रोड वरील फ्रंट आणि साईड मार्जिन तसेच सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणांवरही महापालिकेने कारवाई केली. सहाय्यक आयुक्त संजय पोळ यांच्या नेतृत्वात उमेश गोडगे, मंगेश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. येथील व्यावसायिकांनी आपापल्या दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर जागा लोखंडी काउंटर लावून काही व्यावसायिकांना भाड्याने दिली होती. तसेच बाहेरील फ्रंट मार्जिनचाही व्यावसायिक वापर करण्यात येत होता. या कारवाईत ३४ काउंटर, ८ हातगाड्या, सिलिंडर, पथारी, खुर्च्या, टेबल, जाळ्या इतर आदि साहित्य जप्त करण्यात आले.