Highway Pudhari
पुणे

Pune Highway Projects: पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय; १८ हजार कोटींच्या तीन महामार्ग प्रकल्पांचे आज भूमिपूजन

पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गांना हिरवा कंदील; २५ वर्षे प्रतिकिलोमीटर ९ रुपये टोल, चार वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहर आणि परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या तीन महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांचे शनिवारी (दि.१८ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चून हे प्रकल्प उभारणार असून, प्रतिकिलोमीटर ९ रुपये दराने २५ वर्षे टोल आकारला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली. या वेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मुख्य अभियंता रणजित हांडे आणि कार्यकारी अभियंता अनिल सगर उपस्थित होते. तिन्ही प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, सुमारे १०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. पुणे-शिरूर आणि हडपसर-यवत या दोन्ही प्रकल्पांमध्ये मेट्रोसाठी स्वतंत्र मार्गिका प्रस्तावित केली आहे.

पुणे-शिरूर द्रुतगती महामार्ग ५३.४० किलोमीटर लांबीचा असून, त्यावर ७,५१५ कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गासाठी ४५ ते ५० हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, उन्नत मार्गावर सहा आणि जमिनीवरील मार्गावर दोन अशी एकूण आठ टोल केंद्रे असतील. हडपसर-यवत उन्नत महामार्ग ३१.५० किलोमीटरचा असून, त्यावर ५,२६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर २५ किलोमीटर उन्नत रस्ता आणि ६.५ किलोमीटर जमिनीवरील सहापदरी रस्ता असेल. येथे एकूण पाच टोल केंद्रे असतील.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग ५३.२० किलोमीटरचा असून, त्यावर ५,२०० कोटी रुपये खर्च होणार आहे. पाच टोल केंद्रे प्रस्तावित आहेत. हा मार्ग बाह्य रिंगरोड आणि पुणे-शिरूर द्रुतगती महामार्गाशी जोडला जाणार आहे.

तिन्ही प्रकल्पांची कामे एकाच वेळी सुरू करण्यात येतील. बांधकामादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जाईल आणि त्यासाठी रस्ते सुरक्षा समितीशी समन्वय साधला जाईल.
जितेंद्र डुडी, जिल्‍हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT