Pune Elevated Highway Projects Pudhari
पुणे

Pune Elevated Highway Projects: पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय! तीन उन्नत महामार्गांमुळे ट्रॅफिकमध्ये ३०% घट होणार: मुख्यमंत्री फडणवीस

पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गांचे भूमिपूजन; HCMTR, मेट्रो व अंडरग्राउंड रस्ते प्रकल्पांनाही वेग

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय म्हणून उभारण्यात येणाऱ्या तीन महत्त्वाच्या महामार्गांमुळे शहरातील वाहतूक कोंडीत तब्बल ३० टक्क्यांहून अधिक घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआयडीसी) मार्फत हे महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.

एमएसआयडीसीद्वारे आयोजित पुणे ते शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग तसेच हडपसर ते यवत उन्नत महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्गाचे भूमिपूजन शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या महामार्गांची संकल्पना मांडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन या मार्गांवरील उड्डाणपुलांसह मेट्रोचे पिलर उभारण्याचाही विचार करण्यात आला आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर या मार्गाच्या कामासाठी लवकरच १२६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, त्यामुळे या प्रकल्पाला वेग मिळेल. हडपसर ते यवत या ३१.५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर वर आणि खाली असा सहापदरी रस्ता उभारण्यात येणार असून, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त आणि अधिक जलद प्रवासाचा लाभ मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शहरातील अत्यंत महत्त्वाच्या एचसीएमटीआर रस्त्याच्या कामाला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचबरोबर अंडरग्राउंड (पाताळ लोक) रस्ते प्रकल्पालाही गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे ग्रँड टूरसाठी विकसित करण्यात आलेले रस्ते यंदाच्या पावसाळ्यातही टिकाऊ ठरल्याचे नमूद करीत यापुढेही अशाच दर्जेदार रस्त्यांची उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुढील ३० ते ४० वर्षांची लोकसंख्या आणि गरज लक्षात घेऊन पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत असून, सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी अत्याधुनिक एसटीपी प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या सर्व विकासकामांचा नियमित आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या महामार्गांमुळे पुढील ५० ते १०० वर्षांच्या दृष्टीने पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT