

पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आल्यानंतर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २४ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे येथे होणाऱ्या या कार्यशाळेत राज्यभरातील २०० हून अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि विभागप्रमुख सहभागी होणार आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ५ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ८ ते १२ श्रेयांक असलेली इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीदरम्यान महाविद्यालयांना येणाऱ्या शंकांचे निरसन करणे आणि उद्योग व शिक्षण क्षेत्रातील समन्वय वाढवणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, कॉर्पोरेट प्रतिनिधी आणि नामवंत उद्योगतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रत्येक महाविद्यालयात इंटर्नशिप कक्ष स्थापन करणे, स्थानिक उद्योगांशी सामंजस्य करार करणे आणि विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपचे पारदर्शक मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.