पुणे : भारतातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हल ऑफ केरळमध्ये पुण्याने वेगळी छाप उमटवली आहे. या महोत्सवात पुण्यातील तीन दिग्दर्शकांच्या नाटकांची निवड झाली असून, या महोत्सवात हे तिन्ही नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
केरळमध्ये पुढील वर्षी 25 जानेवारी ते 1 फेबुवारी या कालावधीत होणाऱ्या केरळ आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी अतुल पेठे दिग्दर्शित ‘मॉलप्रॅक्टीस अँड द शो’, शांता गोखलेलिखित व पर्ण पेठे दिग्दर्शित ‘समथिंग लाईक ट्रूथ’ आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘द नेदर’ ही नाटके निवडली गेली आहेत. अतुल पेठे आणि पर्ण पेठे यांच्या रूपाने एकाच महोत्सवात पिता आणि कन्येने दिग्दर्शित केलेल्या नाटकाची निवड होण्याचा बहुमान पुण्याला मिळाला आहे.
केरळच्या या महोत्सवात डेन्मार्क, इटली, नॉर्वे, जपान, अर्मेनिया, पॅलेस्टाईन, अर्जेंटिना, बाझील, स्पेन या देशातून नऊ नाटके तर पुणे, मुंबई, चेन्नई, आसाम, राजस्थान आणि केरळ येथील 14 नाटके सादर होतील. नाटक, छोटेखानी प्रयोग, चर्चा, मुलाखती, संवाद, प्रदर्शने यांनी माहोल रसरशीत झालेला असतो. प्रत्येक नाटक पाहायला प्रेक्षकांच्या रांगा असतात, अशी माहिती अतुल पेठे यांनी दिली.
‘मॉलप्रॅक्टीस अँड द शो’च्या या यशात ऋजुता सोमण (अभिनय), प्रदीप वैद्य ( सहनिर्माता आणि प्रकाश योजनाकार) आणि उमेश वारभुवन (संगीत साथ) यांचा बहुमोल वाटा आहे. तसेच चित्रकार राजू सुतार, श्याम भुतकर आणि जयंत भीमसेन जोशी, हिमांशू बोरकर (मुख्य व्यवस्थापक), प्रशांत कांबळे, सृजन नीला हरिहर, सौम्या छाजेड, यश पोतनीस, सागर डहाळे (रंगमंच व्यवस्था), शुभंकर सौंदणकर आणि सावनी पुराणिक (ॲनिमेशन) यांची भक्कम साथ आहे. या नाटकाचे 20 प्रयोग ‘द बॉक्स’मध्ये पार पडले आहेत. प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. आता या प्रतिष्ठित महोत्सवाने या नाटकावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटवली आहे. महोत्सवपूर्व तयारी म्हणून तीन प्रयोग आम्ही पुण्यात ‘द बॉक्स’ ला पुन्हा करणार आहोत, असेही पेठे यांनी सांगितले.
केरळच्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात यापूर्वी ‘सत्यशोधक’ (2014) आणि ‘समाजस्वास्थ्य’ (2018) ही आमची नाटके निवडली गेली होती. ‘मॉलप्रॅक्टीस अँड द शो’च्या निवडीमुळे ‘तिहाई’ पूर्ण होईल. ही तिन्ही नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळेच नवनवीन प्रयोग करायची ऊर्जा मिळते.अतुल पेठे, नाट्य दिग्दर्शक