Collector Office Pudhari
पुणे

Pune Talathi Transfer Process: ऑनलाइन समुपदेशनामुळे पुण्यात तलाठी-मंडळ अधिकारी बदल्या पारदर्शक

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पुढाकाराने वशिलेबाजीला आळा; मेरिटनुसार बदल्यांचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बदल्यांमधील वशिलेबाजी व हस्तक्षेप थांबवण्यासाठी राबवलेल्या समुपदेशन प्रक्रियेमुळे यंदाच्या तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गाच्या बदल्या पूर्णपणे पारदर्शक व नियमानुसार पार पडल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी तलाठी आणि मंडळअधिकारी यांच्या बदल्यांसाठी ऑनलाइन समुपदेशन राउंड आयोजित केला होता. सेवाज्येष्ठता, रिक्त पदे, दिव्यांग, गंभीर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, प्रशासकीय गरज या सर्व निकषांची संगणकीय प्रणालीद्वारे पडताळणी करून मेरिटनुसार यादी तयार करण्यात आली. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या लॉगिनवर उपलब्ध पर्याय दिसत होते व त्याने निवडलेल्या ठिकाणावरच त्याची नेमणूक करण्यात आली.

हवी ती जागा मिळाली: कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

बदली प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली. “गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच आम्हाला हवी तशी जागा मिळाली. कोणालाही भेटावे लागले नाही, फोन करावा लागला नाही. जे मेरिटमध्ये होते तेच समोर दिसले. ही प्रक्रिया खरोखरच पारदर्शक होती,” असे एका ग्राम महसूल अधिकारी यांनी सांगितले. जे वर्षानुवर्ष एकाच जागेवर ठाण मांडून बसले होते त्यांची बदली झालेने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अंतिम यादीत विनंतीबदली वगळता कोणताही बदल नाही: प्रशासनाकडून स्पष्ट

जिल्हाधिकारी कार्यालयातील बदली कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, समुपदेशन प्रक्रियेतून अंतिम झालेली यादी व कलेक्टर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेले आदेश तंतोतंत जुळतात. “शेवटच्या क्षणी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. काही प्रशासकीय कारणास्तव 2-3 कर्मचाऱ्यांच्या जागांमध्ये विनंतीनुसार तांत्रिक दुरुस्ती करावी लागली, मात्र मूळ यादीप्रमाणेच आदेश निघाले आहेत. यामुळे कोणावरही अन्याय झालेला नाही,” असे प्रशासनाने स्पष्ट केले.

कर्मचारी संघटनांकडून स्वागत

पुणे जिल्हा ग्राम महसूल व मंडळअधिकारी संघटना अध्यक्ष सुधीर तेलंग आणि राज्य संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग मेकाले यांनी या प्रक्रियेचे स्वागत केले तसेच इतर वृत्तपत्रात आलेल्या बदनामीच्या बातमीचा निषेध व्यक्त केला आहे. “जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दाखवलेल्या धाडसामुळे वशिलेबाजीची जुनी पद्धत बंद झाली. यापुढेही सर्व बदल्या याच पद्धतीने व्हाव्यात, अशी आमची मागणी आहे,” असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्रामीण कार्यालये होणार सक्षम

या बदल्या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील तहसील कार्यालये, प्रांत कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी आदी रिक्त पदे 100% भरली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. बदली झालेले सर्व कर्मचारी काही दिवसांत नवीन ठिकाणी रुजू होत आहेत. पारदर्शक बदल्या प्रक्रियेमुळे महसूल प्रशासनावरील कर्मचाऱ्यांचा विश्वास वाढला असून, इतर विभागांसाठी हा पॅटर्न आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT