Bribe Case Pudhari
पुणे

Pune Talathi Bribery Case: दोन कोटींचा दंड टाळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याचा आरोप; तलाठी आणि कोतवालावर गुन्हा दाखल

एसीबीची कारवाई; शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील दोघे अडकले जाळ्यात, ‘निल’ पंचनाम्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जमिनीच्या खोदकामाचा 'निल' पंचनामा करून तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड टाळून देण्याच्या मोबदल्यात १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील महिला तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७) आणि कोतवाल महेश मधुकर मुंढे (३०) या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे खोदकाम कंत्राटदार असून, त्यांच्या कंपनीकडून सेनापती बापट रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ९६७ मधील व्यावसायिक प्रकल्पाच्या इमारतीच्या पायाचे खोदकाम सुरू होते. या कामाची पाहणी करताना तलाठी आश्विनी कोकाटे यांनी नियमानुसार परवानगीपेक्षा तब्बल ३ हजार २०० ब्रास अधिक खोदकाम झाल्याचा पंचनामा केला होता.

या अतिरिक्त खोदकामामुळे तक्रारदारावर सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड आकारला जाऊ शकत होता. हा दंड टाळण्यासाठी तहसीलदारांकडे 'निल' पंचनाम्याचा अहवाल सादर करून देण्याच्या बदल्यात आश्विनी कोकाटे यांनी तक्रारदाराकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर विभागाने पडताळणी केली असता, कोकाटे यांनी लाचेची रक्कम कोतवाल महेश मुंढे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. तसेच महेश मुंढे यानेही लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवून या व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. पडताळणीत लाच मागणीची खात्री झाल्यानंतर मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही कारवाई शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे, पोलिस शिपाई विकास आडके, वैशाली माकर आणि दीपक काकडे यांच्‍या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT