

पुणे: राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना दिल्या आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ॲग्रीस्टॅक काढलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ॲग्रीस्टॅक नंबर काढून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असेही आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात अद्याप ८ हजार ७४९ शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. यामध्ये दौंड (११२६), इंदापूर (१२३२), भोर (१०३१), खेड (९३१), मावळ (७९५), शिरूर (६४५), जुन्नर (६४१), बारामती (६०८), हवेली (५९९), पुरंदर (५२४), आंबेगाव (२२९), वेल्हे (१७६), मुळशी (१३४) आणि पुणे (७८) याप्रमाणे आहे.
तसेच ॲग्रीस्टॅक असलेल्या मात्र, अद्यापही आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ३८२ असून त्यामध्ये दौंड (१,५९७), इंदापूर (१,४६१), बारामती (९२२), भोर (९००), हवेली (८२१), पुरंदर (७५५), खेड (६४०), शिरूर (६१६), जुन्नर (४६४), मावळ (३७३), वेल्हे (३३८), पुणे (२९१), आंबेगाव (१३६) आणि मुळशी (६८) याप्रमाणे आहेत.
शेतकऱ्यांना अँग्री स्टॅक फार्मर आयडी आवश्यक
केंद्र व राज्य शासनाच्या 'अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन' अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा युनिक फार्मर आयडी तयार करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना फार्मर आयडी आवश्यक आहे.
फार्मर आयडी का महत्त्वाचा?
पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी सह सर्व योजनांचा लाभ एकाच आयडीवर
पीक विमा, केसीसी कर्ज, फळबाग अनुदान, आंबा-काजू प्रक्रिया योजनांसाठी नोंदणी सुलभ
ई-पीक पाहणी, 7/12, 8अ ची माहिती डिजिटली जोडली जाणार
भविष्यात कोणत्याही योजनेसाठी कागदपत्रे पुन्हा देण्याची गरज नाही
कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी विशेष योजनांचा लाभ थेट मिळणार
नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचा लाभ पात्र लाभर्थिना थेट मिळणार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड व आधार लिंक मोबाईल नंबर
2. 7/12 व 8अ उतारा
नोंदणी कोठे करावी
1. गावातील सीएससी / महा-ई-सेवा केंद्र
2. https://agristack.gov.in या पोर्टलवर स्वयं-नोंदणी
तरी सर्व सहाय्यक निबंधकांना त्यांच्या तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्यादृष्टीने शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब शेतकरी कर्जमुक्तीशी संबंधित असल्याने कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशाही सूचना जगताप यांनी दिल्या आहेत.