पुणे: बदलत्या वातावरणामुळे शहरातील स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असून, पुण्यात ६९१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतच ६२६ रुग्णांना स्वाईन फ्लू झाला असून, गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात ही संख्या वाढल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
वर्षाच्या सुरुवातीला स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या अत्यल्प होती. जानेवारीत एकही रुग्ण आढळला नाही. फेब्रुवारीत दोन, मार्चमध्ये शून्य, एप्रिलमध्ये पाच, मेमध्ये १० आणि जूनमध्ये १३ रुग्णांची नोंद झाली. जुलैमध्ये रुग्णसंख्या ३५ वर पोहचली. त्यानंतर ऑगस्टमध्ये थेट ३७१ आणि सप्टेंबरमध्ये २५५ रुग्ण आढळले. त्यामुळे जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील केवळ ३० रुग्णांच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत ६६१ रुग्ण नोंदले गेले आहेत.
पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या २० दिवसांत तेथे ४४ रुग्ण आढळले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत एकही रुग्ण नोंदला नव्हता. त्यामुळे ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी किंवा श्वसनाचा त्रास आदी लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
पुण्यातील स्वाईन फ्लूची स्थिती
जानेवारी - ०
फेब्रुवारी - २
मार्च - ०
एप्रिल - ५
मे - १०
जून -१३
जुलै - ३५
ऑगस्ट - ३७१
सप्टेंबर - २५५
एकूण - ६९१
बदलत्या वातावरणामुळे गेल्या दोन महिन्यांत स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंडी, ताप, खोकला, अंगदुखी वारंवार होत असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका