Swargate ST Stand Rickshaw Encroachment Pudhari
पुणे

Swargate ST Stand Rickshaw Problem: स्वारगेट एसटी स्थानकात रिक्षांची घुसखोरी; अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा धोका

मुख्य प्रवेशद्वारावरच रिक्षा उभ्या; एसटी बस चालक आणि प्रवाशांना त्रास, आरटीओ-वाहतूक पोलिसांच्या कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: स्वारगेट एसटी स्थानकात रिक्षाचालकांची घुसखोरी वाढली आहे. स्थानकाच्या आवारात आणि थेट मुख्य प्रवेशद्वारावरच रिक्षाचालक वाहने उभी करीत असल्याने एसटीचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे आगारात दररोज वाहतूक कोंडी होत असून, मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी (दि.५) दै.‌ 'पुढारी‌'कडून करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान समोर आले.

स्वारगेट आगार हे पुण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेले बस स्थानक आहे. येथून रोज शेकडो एसटी बस आणि हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्थानकाच्या आतमध्ये रिक्षांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या एसटी बसना या रिक्षांमुळे मोठा अडथळा निर्माण होतो. बस वळवताना किंवा आगारात घेताना चालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच, ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही या गर्दीतून मार्ग काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानक प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही यात काहीही सुधारणा होत नाही. त्यामुळे आता प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन, यावर कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी एसटी प्रशासनाकडून केली जात आहे.

रिक्षाचालक सातत्याने वाहने घेऊन स्वारगेट आगारात येत आहेत. आम्ही अनेकदा त्यांना सूचना दिल्या, तरीही ते ऐकत नाहीत. आगाराच्या आतमध्ये रिक्षा आणून उभ्या केल्या जात आहेत. एसटी बस आत आणताना चालकांना आणि पायी चालणाऱ्या प्रवाशांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो. आरटीओ आणि पुणे वाहतूक पोलिसांनी या रिक्षाचालकांवर योग्य ती कडक कारवाई करावी.
मोतीराम बलाढये, सुपरवायझर, स्वारगेट, एसटी स्थानक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT