Waste Picker Pudhari
पुणे

Pune Waste Picker Working Conditions: पुण्यात कचरावेचकांचे उन्हात हाल; कामाच्या वेळेत मोठा बदल

वाहनांच्या विलंबामुळे फीडर पॉइंटवर तासन्‌तास प्रतीक्षा; उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी दुपारी 12 पूर्वी काम संपवण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आम्ही सकाळी साडेदहा ते 11 वाजेपर्यंत काम संपवतो. पण, कचरासंकलन करणारी वाहने उशिरा येतात. तोपर्यंत आम्हाला उन्हात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आतातर ऊन खूप वाढले आहे. अशा भर उन्हात काम करणे अवघड बनले आहे. फीडर पॉइंटवर सावलीसाठी जागा नसणे, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह देखील नसणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच आम्ही कचरवेचकांनी आता दुपारी 12 वाजेपर्यंत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ढोले-पाटील रस्ता परिसरातील कचरावेचक नेहा पवार यांनी सांगितले.

स्वच्छ संस्थेचे सदस्य असलेल्या कचरावेचकांकडून शहरात घरोघरी जाऊन कचरासंकलन केले जाते. संस्थेने घेतलेल्या दैनंदिन पाहणीत कचरावेचकांना कचरासंकलन करणाऱ्या वाहनांच्या विलंबामुळे दुपारी वाढत्या उन्हात बाहेर थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. पाहणीत पुण्यातील 1018 फीडर पॉइंट्‌‍सपैकी (ज्या ठिकाणी कचरावेचक ओला आणि सुका कचरा महापालिकेच्या वाहनांना हस्तांतरित करतात), 37% ठिकाणी वाहने उशिरा आली आणि 10% फीडर पॉइंट्‌‍सवर वाहने आलीच नाहीत.

दुपारी पुण्यात रोज तापमान वाढत असताना या विलंबामुळे कचरावेचकांना, ज्यातील बहुतांश महिला आहेत, उष्णतेमुळे असलेले गंभीर आरोग्य धोके निर्माण होत असल्याचे संस्थेने केलेल्या पाहणीत दिसून आले. राज्य सरकारच्या या महिन्यात जारी केलेल्या मार्गदर्शक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन कामगारांसारख्या कामगारांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेरचे काम बंद ठेवायचे आहे.

या नियमांनुसार आता स्वच्छ संस्थेच्या कचरावेचकांनीही घरोघरी कचरासंकलनाचे काम दुपारी 12 वाजेपर्यंत संपविण्याचा निर्णय घेतला आहे. कचरावेचक रोज सकाळी दारोदारी संकलनाचे काम सुरू करतील आणि दुपारी 12 च्या आत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार संपवतील. जर तुम्हाला कचरावेचक उन्हात काम करताना दिसले तर त्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहात प्रवेश आणि जेथे शक्य असेल तेथे सावलीत बसण्याची जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन स्वच्छ संस्थेने केले आहे.

नियमानुसार सकाळी 6 वाजता आम्ही हजेरी देतो. आमचे काम आठ ते साडेआठपर्यंत संपते. माझा पॉइंट सोसायटी आणि शाळेजवळ आहे. जर कचरासंकलन करणारी गाडी वेळेत नाही आली आणि कचरा तिथेच राहिला तर लोक आम्हाला ओरडतात.
राजू गायकवाड, कचरावेचक
आम्हाला ना पाणी मिळते, ना चहा. कचरा सकाळी उचलून येथे आणायचा आणि मग उन्हात गाडीसाठी फोन करीत बसायचे. तरीपण गाडी काही वेळेत येतच नाही. आम्ही आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करीत आहोत. आमच्या कामालाही आदर दिला पाहिजे.
वैजंता वाघमारे, कचरावेचक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT