Pune Station Travel Rush Pudhari
पुणे

Pune Summer Travel Rush: उन्हाळी सुट्यांचा ‘गावाकडे ओघ’; स्वारगेट बसस्थानकावर गर्दी उसळली

पुण्यातून हजारो प्रवासी बाहेरगावी रवाना; एसटी व रेल्वे स्थानकांवर 20-30% गर्दी वाढ, अतिरिक्त बसेसची सोय सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उन्हाळी सुट्या लागल्या... आम्ही चाललो गावाला!‌’ हे वाक्य सध्या पुण्याच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळत आहे. शाळेला सुट्या पडताच अनेकजण कुटुंबासह आपल्या मूळ गावी किंवा सहलीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख वाहतूक केंद्रांवर म्हणजे विशेषतः स्वारगेट एसटी बसस्थानक आणि पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची तुडुंब गर्दी होत आहे.

एसटीच्या पुण्यातील स्वारगेटसह शिवाजीनगर (वाकडेवाडी) बसस्थानकावरही बाहेरगावी जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. फक्त एसटी बसस्थानक नव्हे, तर रेल्वेस्थानकावरही हेच चित्र आहे. उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठी गर्दी असून, रेल्वे प्रशासनानेसुद्धा अनेक उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या आहेत.

स्वारगेट आगारात प्रवाशांचा ओघ वाढला

स्वारगेट एसटी आगारातून दररोज सरासरी 12,000 प्रवाशांची ये-जा असते. मात्र, 24 एप्रिल 2026 पासून या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या दररोज 3 ते 4 हजार अतिरिक्त प्रवासी प्रवास करत असून, हा आकडा वाढत आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रशासनाचे नियोजन

वाढती गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. प्रवास प्रवास सुखकर व्हावा, यासाठी स्वारगेट आगार प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लातूर, उदगीर, अहमदपूर आणि म्हसवड या मार्गांवर प्रवाशांची मागणी जास्त असल्याने येथे विशेष नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. कडक उन्हाचा त्रास प्रवाशांना होऊ नये, म्हणून स्थानकाच्या छतावर 14 नवीन पंखे बसवण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरच 4 वॉटर कुलर कार्यान्वित करण्यात येणार आहेत, याशिवाय तिकीट काढण्यासाठी स्थानकावरच करंट बुकिंग योजना सुरू करण्यात आली आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे स्वारगेट बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी 20 ते 30 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढती संख्या विचारात घेऊन आम्ही लातूर, अहमदपूरसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर चार अतिरिक्त बस सोडत आहोत. आमचे प्राधान्य प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध करून देणे आणि स्थानकावर त्यांना पिण्याचे पाणी व सावलीची सोय करून देणे हे आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटीलाच पसंती द्यावी.
प्रमोद धायतोंडे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT