Pudhari Maza Bappa 2026 Pudhari
पुणे

Pudhari Maza Bappa 2026: बालशिल्पकारांनी आत्मविश्वासाने साकारले गणराय

'माझा बाप्पा-२०२६' उपक्रमांतर्गत नू. म. वि. प्रशालेत रंगली कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एकाग्रतेने अन्‌ आत्मविश्वासाने बाप्पाची मूर्ती साकारणारे विद्यार्थी... मनात बाप्पाची भक्ती... गणरायाची मूर्ती साकारल्यानंतर आनंदाने फुललेले विद्यार्थ्यांचे चेहरे अन्‌ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा बालशिल्पकारांनी केलेला निर्धार, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गुरुवारी 'माझा बाप्पा-२०२६' उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळा नू. म. वि. प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात (बाजीराव रस्ता) रंगली.

विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून विविध रूपांतील श्रीगणेशाच्या मूर्ती साकारल्या अन्‌ त्यांच्यातील कलागुण पाहून कला शिक्षकही आनंदित झाले. प्रत्येकाने मनात कल्पिलेली बाप्पाची मूर्ती साकारली आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करण्याचा निर्धारही केला.

'पुढारी' माध्यम समूह, पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने 'माझा बाप्पा-२०२६' उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या.

या उपक्रमाचा समारोप नू. म. वि. प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेने झाला. उपक्रमाचे सहप्रायोजक असलेल्या केले ग्रुपचे संचालक अभय केले आणि प्रशालेच्या चित्रकला विभागाचे प्रमुख दत्तात्रय वेताळ यावेळी उपस्थित होते.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाला सॉलिटर ग्रुप, गोयल गंगा ग्रुप, बढेकर ग्रुप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, ऑटोट्रॉनिक्स इंजिनीअरिंग प्रा. लि. आणि केले ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दुपारी ३ वाजता कार्यशाळेला सुरुवात झाली. मूर्ती साकारण्यासह तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना जलप्रदूषण, निसर्गाची हानी यासह पर्यावरण संवर्धनासाठी काय केले पाहिजे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे का आवश्यक आहे, याची माहिती दिली.

सुरुवातीला शाडूमातीच्या तयार केलेल्या श्री गणेशमूर्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. याशिवाय यंदाच्या उत्सवात विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या श्री गणेशमूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा पालकांनी करावी, असे आवाहनही करण्यात आले. या उपक्रमाला भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या शिल्पकला विभागाचे प्रमुख सुनील देशपांडे, प्रा. ओंकार पवार आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले.

या कार्यशाळेत कीर्ती मुळे, तेजस राठोड, जिज्ञासा कुंभार, सतीश कीर्तीकर, राकेश चव्हाण आणि शिवानी वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मूर्तीनिर्मितीसाठी मार्गदर्शन करत सोप्या आणि रंजक पद्धतीने मातीपासून मूर्ती तयार करण्याचे तंत्र शिकवले. पीओपी मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि सण-उत्सव पर्यावरणपूरक

पद्धतीने साजरे करण्याची गरज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मातीच्या गोळ्याला आकार देत विद्यार्थ्यांनी बाप्पाची सुंदर मूर्ती साकारल्या.

कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी वेदांत हजारे आणि ओम पाटेकर म्हणाले, या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर शाडूमातीच्या मूर्तीचे पर्यावरणीय महत्त्वही कळले. मार्गदर्शकांनी खूप चांगल्या पद्धतीने मूर्तीनिर्मितीबद्दल सांगितले. आम्ही साकारलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यास पालकांना विनंती करणार आहोत.

'पुढारी' माध्यम समूहाने आयोजित केलेला 'माझा बाप्पा २०२६' उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांना शाडूमातीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारताना पाहून खूप आनंद झाला. अशा उपक्रमात सहभागी होऊन छान वाटले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजला पाहिजे. अशा उपक्रमांमुळे हा संदेश मुलांपर्यंत पोचू शकतो.
- अभय केले, संचालक, केले ग्रुप
'पुढारी' माध्यम समूहाने आयोजित केलेल्या 'माझा बाप्पा २०२६' उपक्रमात विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने आणि आत्मविश्वासाने लाडक्या बाप्पाची मूर्ती साकारली हे पाहून आनंद झाला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. हेच गुण त्यांना अभ्यासातही उपयोगी पडतील. शाडूमातीपासून तयार केलेल्या श्री गणेशमूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा घराघरांमध्ये व्हायला हवी. पर्यावरण संवर्धनासाठी हे खूप गरजेचे आहे.
- दत्तात्रय वेताळ, चित्रकला विभागप्रमुख, नू. म. वि. प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT