पुणे: तुझी बदनामी करीन, तुझ्या आई-वडलांना जिवे मारीन, अशा विविध धमक्या देऊन मानसिक छळ केल्यामुळे अगदी कोवळ्या वयातच मुलींनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना घडल्या. तर, एका 21 वर्षीय तरुणाने स्वतःला संपविल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे कोवळ्या वयातच आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
रूममेटचा जाच; तरुणीने घेतला गळफास
रूममेटच्या जाचाला कंटाळून 19 वर्षीय मुलीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 9 मार्चला सकाळी साडेसातच्या सुमारास चंदननगरमधील विठ्ठलनगरातील अरिहंत कॉम्प्लेक्स, महावीर सोसायटीत घडली. याप्रकरणी तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या तिघांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पायल किशोर
राजगुरू (वय 19, रा. कासार आंबोली, मुळशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सबुरी संतोष काळे (वय 25), शिवानी श्याम आजबले (वय 26) आणि दीपाली (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदनगरमधील विठ्ठलनगरात अरिहंत कॉम्प्लेक्स, महावीर सोसायटी असून, त्या ठिकाणी पायल राजगुरू हिच्यासह चौघी राहत होत्या. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाल्यानंतर तिघींनी पायलला मानसिक त्रास दिला. तिची बदनामी करण्याची धमकी देऊन आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. सततच्या जाचाला कंटाळून पायलने 9 मार्चला सकाळच्या सुमारास खोलीतील पंख्याला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दशरथ तलेदवार तपास करीत आहेत.