Stray Dogs Pudhari
पुणे

Pune Stray Dogs: पुण्यात भटक्या श्वानांचा वाढता धोका

रस्त्यावर आणि सोसायटीत हल्ल्यांमुळे नागरिकांना सुरक्षिततेचा भितीदायक अनुभव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न आता भीतीदायक आणि जीवघेणा बनू लागला आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या चिमुकल्यांपर्यंत तसेच रात्री उशिरा दुचाकीवरून घरी परतणाऱ्या तरुणांपर्यंत अनेक जण श्वानांच्या हल्ल्यांना सामोरे जात आहेत. काही भागांत टोळ्यांनी फिरणारे हे श्वान अचानक रस्त्यात धाव घेत वाहनांमागे लागतात, तर काही ठिकाणी थेट नागरिकांवर झडप घालतात. याशिवाय मध्यरात्री त्यांचे कर्कश भुंकणे आणि विव्हळणे, यामुळे अनेक वस्त्यांतील रहिवाशांची झोप उडाली आहे. भटक्या श्वानांनी उच्छाद मांडलेला असताना महापालिकेची यंत्रणा मात्र फेल ठरल्याचे दिसत आहे.

शहरात वाढत चाललेल्या या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव होत असून, भटक्या श्वानांचा प्रश्न तातडीने हाताळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, रस्त्यावर टाकला जाणारा कचरा आणि काही नागरिकांकडून या श्वानांना नियमित खाऊ घालण्याच्या सवयीमुळे भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. महापालिकेने 2023 मध्ये केलेल्या गणनेनुसार शहरात सुमारे 1 लाख 80 श्वान असल्याचा दावा केला गेला. मात्र, सध्या ही संख्या दोन ते तीन लाखांच्या घरात पोहचल्याचा अंदाज आहे.

आरोग्य विभागानुसार दरमहा 900 जणांना श्वानदंश

श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून नियमित नसबंदी मोहीम राबविली जाते. तरीही वाढत्या संख्येच्या तुलनेत या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याचे दिसून येते. परिणामी, गेल्या काही दिवसांत श्वानांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात दरमहा सरासरी 900 पेक्षा अधिक नागरिकांना भटक्या श्वानांकडून चावा घेतला जातो. पूर्वी रस्त्यांपुरते मर्यादित असलेले हल्ले आता सोसायट्यांच्या आवारातही घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शहरात 1 लाख 80 हजार श्वान असल्याचा दावा

शहरात नव्याने 32 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या प्रत्यक्षात तीन लाखांपेक्षा जास्त आहे. महापालिकेच्या 2023 च्या सर्वेक्षणात शहरात केवळ 1 लाख 80 श्वानां असल्याचा दावा केला जातो. शहर 2030 पर्यंत रेबिजमुक्त करण्याचे उद्दिष्ट महापालिकेमार्फत ठेवण्यात आले आहे. यासाठी काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भटके श्वान पकडून त्यांची नसबंदी करून त्यांना अँटिरेबीजचे इंजेक्शन देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. कात्रज, नायडू रुग्णालय, बाणेर, केशवरनगर, वडकी, होळकरवाडी, अशा सहा ठिकाणी कुर्त्यांची नसबंदी केली जाते. दररोज 60 ते 180 कुर्त्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. त्यादृष्टीने महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना मात्र तुटपुंज्या आहेत.

श्वान पकडण्याचे टार्गेट दिले जात नाही

पालिका अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार शहरात भटके श्वान पकडण्यासाठी 13 गाड्या आहेत. महापालिकेच्या 9, तर बाकी स्वयंसेवी संस्थांच्या आहेत. एकूण कर्मचारी 40 ते 50 आहेत. मात्र, प्रत्यक्षात श्वान पकडण्याचे टार्गेट दिले जात नाही.

भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारणे सुरू

सुप्रीम कोर्टाने शासकीय संस्था, महाविद्यालये, शाळा, कोर्ट परिसरातील भटक्या श्वानांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून त्यांना शेल्टरमध्ये हलविण्याचे आदेश दिले होते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांना ठेवण्यासाठी पालिकेकडे शेल्टर नाहीत. सध्या ते उभारण्याचे काम सुरू आहे.

सोसायट्यांच्या आवारात अनेक जण भटक्या श्वानांना खाऊ घालतात. त्यामुळे श्वानांची संख्या वाढत आहे. महापालिकेमार्फत कोणत्याच उपाययोजना होत नाही. आता हेच श्वान येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या अंगावर धावू लागले आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे
प्रदीप कांबळे, रहिवासी, सूस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT