

बारामती : शेतकर्यांच्या कर्जमाफीसंबंधी राज्य सरकार सकारात्मक असून, 30 जूनपूर्वी याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भरणे यांनी भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी कृषिमंत्री भरणे म्हणाले, कर्जमाफीच्या अनुषंगाने प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असून तो प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसोबतच्या बैठकीत ओळख करून घेण्यात आली. मतदारसंघातील अडीअडचणी समजून घेऊन पुढील दिशा ठरविण्यावर बैठकीत चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, याबाबत बोलणे उचित नसल्याचेही मंत्री भरणे यांनी नमूद केले.
पुणे जिल्हा परिषदेत मतदारांनी एकहाती सत्ता दिली असून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. पुढील चार वर्षे निवडणुका नसल्याने विकासकामांवर भर दिला जाईल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना दिली.