Dog Attack Pudhari
पुणे

Pune Dog Bite Cases: पुणे जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा वाढता धोका; ९ महिन्यांत ७७ हजारांहून अधिक जणांना चावा, रेबीजचे १४ मृत्यू

राज्यात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटनांची पुणे जिल्ह्यात नोंद; गेल्या वर्षीच्या तुलनेत चावण्याच्या घटना घटल्या, मात्र रेबीज मृत्यू वाढले

पुढारी वृत्तसेवा

विनय पुराणिक

पुणे: शहरासह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत पुणे जिल्ह्यात कुत्रा चावण्याच्या तब्बल ७७ हजार २८६ घटनांची नोंद झाली आहे. त्यापैकी राज्यातील सर्वाधिक घटना पुणे जिल्ह्यात घडल्या आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये घट झाली असली, तरी रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मात्र १० वरून १४ वर पोहोचली आहे. त्यामुळे या घटनांवर नियंत्रण मिळविण्याबरोबरच रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि वेळेवर उपचारांची यंत्रणा सक्षम करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात कुत्रा चावण्याच्या ९५ हजार ५३५ घटनांची नोंद झाली होती. यंदा ही संख्या ७७ हजार २८६ झाली आहे. मात्र, इतर प्राण्यांच्या चावण्याच्या १८ हजार ३३५ घटनांची भर पडल्याने प्राणी चावण्याच्या एकूण घटनांचा आकडा ९५ हजार ६२१ वर गेला आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये घट होत असताना रेबीजमुळे मृत्यू वाढणे, ही चिंतेची बाब आहे.

राज्यभरात याच कालावधीत कुत्रा चावण्याच्या चार लाख ८० हजार २०६, तर इतर प्राण्यांच्या चावण्याच्या एक लाख १८ हजार २१ घटनांची नोंद झाली. रेबीजमुळे राज्यात ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३३ मृत्यू झाले असून, यंदाच्या चालू वर्षात ही संख्या वाढली आहे.

पुण्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतील रेबीज मृत्यूंची नोंदही पुण्यात होते. महापालिकेकडून निर्बीजीकरण, लसीकरण आणि निवारागृहांच्या माध्यमातून उपाययोजना सुरू आहेत, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील प्रमुख जिल्हानिहाय घटना

  • पुणे ७७,२८६ १४

  • अहिल्यानगर ३०,४१३ ८

  • ठाणे २६,६८३ ७

  • सोलापूर २८,६२० ६

ग्रामपंचायतपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण तसेच रुग्णांना औषधोपचार, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. मधल्या काळात लशींचा पुरवठा खंडित झाला होता. मात्र, नव्याने औषधे मागवून पुरवठा करण्यात आला आहे. तसेच, स्थानिक पातळीवर लस, औषध उपलब्ध नसल्यास त्या पातळीवर खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT