चाकण : दुकानातून चिकन घेतल्यानंतर चिकनचे पैसे मागितल्याने दुकानातील परप्रांतीय कामगाराला मारहाण करण्यात आली. तसेच दुकानावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी देशमुखवाडी (ता. खेड) येथील सरपंचासह पाचजणांवर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना वहागाव येथे सोमवारी (दि. १२) घडली.
याप्रकरणी ओमकार अबीनाथ देशमुख (रा. देशमुखवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देशमुखवाडीचे सरपंच दत्ता अनिल देशमुख, नितीन बाळासाहेब शिळीमकर, किरण अनिल देशमुख, अनिल रूपाजी देशमुख आणि अतुल अशोक देशमुख (सर्व रा. देशमुखवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार देशमुख यांचे वहागाव येथे चिकन विक्रीचे दुकान आहे. सोमवारी दुकानात गोंधळ सुरु असल्याचे लक्षात आल्याने ते दुकानी गेले असता देशमुखवाडीचे सरपंच दत्ता अनिल देशमुख व त्यांचे चार साथीदारांनी दुकानातील कामगाराकडे चिकनची मागणी केली. तसेच 'पश्चिम बंगाल येथून मुली घेऊन ये, तिकडे मुली स्वस्त मिळतात, तुला ३० हजार रुपये महिना पगार देतो,' असे सांगितले. कामगाराने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर कामगाराने चिकन दिले व पैसे मागितले. त्यावरून चिडलेल्या सरपंच व त्यांच्या साथीदारांनी कामगारास मारहाण करत दगडफेक केली. तसेच दुकानातील चिकन, अंडी यांचे नुकसान केले, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले. महाळुंगे पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.