St Bus Pudhari File Photo
पुणे

Pune ST Pandharpur Special Buses: आषाढी एकादशीसाठी पुणे विभागातून पंढरपूरला ३५० जादा एसटी बस; २१ ते २६ जुलैदरम्यान विशेष सेवा

वारकऱ्यांसाठी २४ तास बससेवा, 'जिजाऊ' व 'परिवर्तन' बस उपलब्ध; महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या सवलती कायम

पुढारी वृत्तसेवा

​पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठू माउलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या व प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी पुणे विभागाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. शनिवारी (दि. २५) आषाढी एकादशी साजरी होणार असल्याने भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुणे विभागातून पंढरपूरसाठी ३५० जादा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी प्रवाशांनी आणि विठ्ठलभक्तांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी केले आहे.

ही विशेष बससेवा २१ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत अहोरात्र चालविण्यात येणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्य स्वारगेट बसस्थानकासह पुणे जिल्ह्यातील विविध प्रमुख तालुका मुख्यालयांवरून या बस सोडण्याचे नियोजन केले आहे.

विशेष म्हणजे, यात्रेच्या मुख्य कालावधीत म्हणजेच २३ आणि २४ जुलै रोजी पंढरपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस २४ तास उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे भाविकांना वेळेचे बंधन न राहता कोणत्याही वेळी आपला प्रवास अत्यंत सोईस्करपणे करता येणार आहे.

जादा गाड्यांना विशेष सवलतीही लागू राहणार

​या विशेष यात्रेसाठी एसटी प्रशासनाने आपल्या ताफ्यातील अत्यंत आरामदायी ''जिजाऊ'' आणि नवीन ''परिवर्तन'' प्रकारातील बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लांब पल्ल्याचा हा प्रवास भाविकांसाठी अधिक सुसह्य होईल. याशिवाय, राज्य शासनाने लागू केलेल्या सर्व अधिकृत सवलती, जसे की ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत, महिलांसाठी असणारी ''महिला सन्मान योजना'' (५० टक्‍के तिकीट दर) आणि विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवासी सवलती, या विशेष यात्रेच्या गाड्यांनाही पूर्णपणे लागू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

स्वारगेट स्थानकावर विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती

​स्वारगेट बसस्थानकावर प्रवाशांना तिकिटे, आरक्षणाची सुविधा, बसचे अचूक वेळापत्रक आणि इतर आवश्यक माहिती तत्काळ मिळावी, यासाठी अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती केली आहे. या नियोजनामुळे पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि त्रासमुक्त होईल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT