ST Bus pudhari photo
पुणे

Pune ST Division Revenue: एसटीच्या पुणे विभागाची विक्रमी कमाई! एकाच दिवसात ३ कोटींचे उत्पन्न

९२० बस रस्त्यावर; प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोजच्या सरासरी उत्पन्नात एक कोटींची भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एसटीच्या पुणे विभागाने प्रवासी वाहतुकीत नवा उच्चांक प्रस्थापित केला असून, रविवारी (दि.१५ नोव्हेंबर) एकाच दिवसात तब्बल ३ कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळवले आहे. या दिवशी विभागातील विविध आगारांतून ९२० बस रस्त्यावर धावल्यामुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठणे शक्य झाले असल्याची माहिती एसटीच्या पुणे विभाग प्रशासनाने दिली.

सर्वसाधारण दिवसांमध्ये एसटीच्या पुणे विभागाला दररोज सरासरी दोन कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, रविवारी प्रवाशांचा मोठा ओघ आणि विभागाने केलेले अचूक नियोजन यामुळे उत्पन्नात तब्बल एक कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.

या दिवशी पुणे विभागातील सर्वच आगारांनी पूर्ण क्षमतेने सेवा बजावत ९२० बसच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर सेवा दिली. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह ग्रामीण भागातील फेऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, दिवाळी जादा गाड्यांचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळे पुणे विभागाने हे यश संपादन केले आहे.

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना खासगी वाहतुकीकडे वळावे लागू नये, यासाठी प्रशासनाने वेळापत्रकाचे काटेकोर पालन केले. परिणामी, प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, एसटी पुणे विभागाच्या तिजोरीत विक्रमी महसूल जमा झाल्याची नोंद रविवारी झाली.

प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी आमचे अधिकारी, चालक आणि वाहक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. रविवारी योग्य नियोजनातून ९२० गाड्यांचे संचलन करण्यात आले. त्यामुळे पुणे विभागाला एकाच दिवसात ३ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशांचा हा प्रतिसाद असाच कायम राहावा, यासाठी आम्ही अधिक सक्षम सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.
अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT