पांडुरंग सांडभोर
पुणे: सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आकाशवाणी ते भैरोबानाला यादरम्यान जंक्शन सुधारण्यासाठी २७५ कोटी रुपयांचा संकल्पना आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. या कामासाठी तत्त्वतः मान्यता देण्याची विनंती महामेट्रोने पुणे महापालिकेकडे केली आहे. या आराखड्यानुसार उन्नत रस्त्याचे काम भैरोबानाल्याऐवजी रेसकोर्सपासून सुरू करण्याचा प्रस्ताव महामेट्रोने मांडला आहे.
केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या खराडी मेट्रोमार्गिका तसेच एसएनडीटी ते माणिकबाग मार्गिकेला डिसेंबर २०२५ मध्ये मंजुरी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आकाशवाणी (हडपसर) ते यवतदरम्यान सहापदरी उन्नत रस्त्याचे नियोजन केले आहे. हा उन्नत रस्ता आकाशवाणी ते भैरोबानाला, असा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार झालेल्या बैठकीनंतर महामेट्रोने एसटीयूपी कन्सल्टंट्स प्रा. लि. यांची वाहतूक सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या संस्थेने रेसकोर्स ते मांजरी जंक्शन या मार्गाचा वाहतूक सर्वेक्षण व अभ्यास केला. त्याआधारे जंक्शन सुधारणा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात महत्त्वाच्या चौकांवर क्लोव्हर लीफ, अंडरपास तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कामाचा प्राथमिक खर्च
२७५ कोटी रुपये असून, भूसंपादन, रस्ता रुंदीकरण आणि तीन उड्डाणपुलांच्या पाडकामाचा खर्च या अंदाजात समाविष्ट नसल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. महापालिकेने या आराखड्याची छाननी करून पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे. यासंबंधीचे पत्र महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी महापालिकेला पाठवले आहे.
पुलांच्या पाडकामाचा खर्च आराखड्यात नाही
आकाशवाणी ते भैरोबानाला या उन्नत रस्त्याचा काही भाग प्रस्तावित मेट्रो मार्गिकेशी समांतर येत असल्याने हडपसर पूल, संत ज्ञानेश्वर उड्डाणपूल आणि संत तुकाराम उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या तिन्ही पुलांच्या पाडकामाचा खर्च मात्र महामेट्रोने केलेल्या आराखड्यात समाविष्ट केलेला नाही.