voter verification Pudhari
पुणे

Pune SIR Voter Verification: पुण्यात एसआयआरची डोकेदुखी वाढली; २१.२७ लाख मतदार स्थलांतरित, मृत किंवा अनुपस्थित

बीएलओंना माहिती देण्यास काही मतदारांची टाळाटाळ; १७ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत काही मतदारांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आतापर्यंतच्या पडताळणीत २१ लाख २७ हजार मतदार स्थलांतरित, अनुपस्थित, मृत आणि खोटी असल्याचे आढळून आले आहे. संबंधित मतदारांची पडताळणी झाल्यानंतर या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासंदर्भात कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती वेळेत आणि कागदपत्रांसह देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्राशासनाकडून करण्यात आले.

जिल्ह्यात एसआयआर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आत्तापर्यंत ९० लाख ८० हजार १२३ मतदार आहेत. प्रत्येक क्षेत्र आणि वार्ड स्तरावर बीएलओ नेमण्यात आले असून त्यांच्याकडून मतदारांना मोबाईलद्वारे संपर्क साधून माहिती दिली जात आहे. तसेच गणनेसंदर्भात अर्ज दिले जात आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ८४ लाख ८१ हजार ८८३ मतदारांना (९३.४३ टक्के) गणना अर्जांचे वाटप करण्यात आले. उर्वरित अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, यापैकी अडीच हजार मतदारांनी हे अर्ज भरून परत दिले नाहीत.

बीएलओंकडून मतदारांना वारंवार संपर्क करूनही आज देतो, उद्या देतो, बाहेर आहे. माहिती नाही, असे सांगून अर्ज भरून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे बीएलओंना गणना अर्ज भरून घेताना कसरत करावी लागत असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

तसेच ज्या मतदारांनी गणना अर्ज भरून दिले आहे, त्यापैकी ५८ लाख ८२ हजार गणना अर्जांची डिजिटल नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित अर्जांची नोंदणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून एसआयआर कार्यक्रमाला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत बीएलओकडून गृहभेटी देऊन गणना अर्जांचे वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एआयआरच्या कार्यक्रमानुसार २४ ऑगस्ट रोजी मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. सुनावणी प्रक्रिया २४ ते २२ ऑक्टोबरपर्यंत, तर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अनेक मतदारांनी बीएलओंकडून गणना अर्ज घेतले आहेत. मात्र, ते भरून दिले जात नसून टाळाटाळ केली जात आहे. अर्ज घेतलेल्या उमेदवारांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांसह संबंधित माहिती भरून अर्ज माघारी द्यावे.
मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT